लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मतमोजणीच्या पहिल्या तासाभरामध्ये अटीतटीची लढत दिसून येते. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रातील ३८ जागांचे कल समोर आले असून, त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस दिसून येत आहे. तसेच पहिल्या तासाभरामध्ये महायुती २० आणि महाविकास आघाडी १७ जागांवर आघाडीवर आहे. तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे.
पहिल्या तासाभरातील कलांमधील पक्षनिहाय जागा पाहायच्या झाल्यास भाजपा १३, शिवसेना ठाकरे गट ७, काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ४, शिवसेना शिंदे गट ५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ आणि एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे महाराष्ट्रावर राहिलंय. येथे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली. तसेच मतदान आटोपल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधूनही चुरशीच्या लढतीचे संकेत मिळाल्याने आता आज होत असलेल्या मतमोजणीमधून जनमताचा कौल कुणाला मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने २८, शिवसेना शिंदे गटाने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४ आणि रासपने १ जागेवर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने २१, काँग्रेसने १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती.
लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात मागच्या वेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपाला २३ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. तसेच एमआयएमच्या खात्यात एक जागा गेली होती.