लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या निकालांनंतर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्या व्हिडीओमध्ये आशिष शेलार हे महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास मी राजकारणातून संन्यास घेणार, असं बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता शेलार राजकारणातून कधी संन्यास घेणार, अशी विचारणा केली जात आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. भाजपच्या शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे, असं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे.
याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपचे आशिष शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे. उदय सामंत जातीयवादी बोलत आहेत. त्यांना फक्त चिरा(दगड), आंबा, मासे इतकीच माहिती आहे. अवकाळी पावसासारखा त्यांचा आनंद आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, मोदी लाट संपली आहे. याचे भान या नेत्यांना नाही. अशा वाचाळवीरांमुळेच भाजप महाराष्ट्रात एक आकड्यावर आली आहे. त्यामुळे अशा नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असे देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. देशात बाबासाहेबांचा विचार मानणारा, संविधानाबद्दल आदर असणारा मतदार राजा आजही आहे. त्यामुळे जुमलेबाज टिकणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.