Ajit Pawar on Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही. दुसरीकडे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. महाराष्ट्रात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यापैकी एकाच जागेवर अजित पवार गटाला यश मिळालं. या पराभवानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मानहानिकारक पराभव झाला. दुसरीकडे धाराशिवमध्येही भाजपकडून जागा घेतल्यानंतर अजित पवार गटाने तिथे अर्चना पाटील याना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचाही पराभव झाला. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना खुले आव्हान देऊन अजित पवार यांनी इशाराच दिला होता. मात्र तिथेही राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाने राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली आहे. या सगळ्यानंतर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन! पुनश्च धन्यवाद!," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
रायगडमध्ये सुनील तटकरेंचा विजय
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी ५०८३५२ मते मिळवत अनंत गीते यांचा पराभव केला. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक ८२,७८४ मतांनी जिंकली. तर अनंत गीते यांना ४२५५६८ मते मिळाली आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.