हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:21 PM2024-06-05T19:21:38+5:302024-06-05T19:24:01+5:30
loksabha Election Result - मुंबईतील उमेदवारांच्या पराभवानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
मुंबई - Deepak Kesarkar on Uddhav Thackeray ( Marathi News ) हिंदुत्व सोडून काँग्रेस सोबत गेलेल्या उबाठाबाबत मुस्लीम समाजाला खात्री झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत फतवे काढून उबाठा उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले. मुस्लीम मतांमुळेच उबाठाचे उमेदवार निवडून आले अशी टीका शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली. निवडणुकीतील महायुतीचा पराभव आम्ही मान्य करतो. चुकलेल्या गोष्टी दूर करुन नव्या दमाने जनतेसमोर पुन्हा जाऊ असा विश्वासही केसरकरांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून उबाठाकडून महाराष्ट्रात एक वेगळे चित्र तयार केले जात आहे. ज्यात मराठी मतदार शिवसेनेसोबत नाहीत असा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र १३ पैकी ७ ठिकाणी आम्ही उबाठा गटाच्या उमेदवारांचा पराभव केला. मुंबईकरांची मते आणि मराठी मते शिवसेनेला मिळाली. मुंबईतील ८० टक्के मतदार शिवसेनेसोबत होती असं केसरकरांनी म्हणत ज्या ६ ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला तिथे उमेदवारी उशीरा जाहीर केल्याने फटका बसला असल्याचं मान्य केले.
तसेच उबाठाच्या उमेदवारांसाठी मुंबईत फतवे काढण्यात आले होते. अन्यथा उबाठाचे उमेदवार एक ते दीड लाख मतांनी पराभूत झाले असते असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आला होता.पाकिस्तानमधील दोन मंत्री मोदींच्या पराभवाचे आवाहन करत होते आणि इथले काहीजण ते ऐकत होते हे दुर्देवी आहे. निवडणुकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन दलित बांधवांची दिशाभूल करण्यात आली. मराठा आंदोलना दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला. मात्र निवडणुकीत काही ठिकाणी ठरवून मतदान झाले. ज्यामुळे महायुतीच्या बड्या नेत्यांचा पराभव झाला. याचेही विश्लेषण होणे आवश्यक आहे असं केसरकरांनी म्हटलं.
महाराष्ट्राबाबत प्रेम असेल तर...
ज्या शिवसेनेची कोकणातून सुरुवात झाली त्या सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंत उबाठाला एकही जागा मिळाली नाही. कोकणी जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे हे यातून दिसून आले. कोकणातील जनतेने नारायण राणे यांना निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा या देशाचे नेतृत्व करावे, असा सुस्पष्ट कौल दिला आहे. तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून कौल मिळाला आहे. बाळासाहेबांनी सत्तेची पर्वा केली नाही. महाराष्ट्राबाबत प्रेम असेल तर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार यांना विरोधी पक्षनेते पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असा टोला मंत्री केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.