भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. शहरासह गावात जे वातावरण होते ते भाजपच्या विरोधात होते. विशेषत: शेतकरी, बेरोजगार युवक प्रचंड नाराज होते. अशा स्थितीत निवडणुकीचा असा निकाल असा अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या निकालानंतर भंडारा येथे प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर यावर नेमके काय बोलायचे याबाबत आम्ही सर्वच निरूत्तर आहोत. गावागावातील वातावरण व राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान जनमताचा कौल हा भाजपविरोधी होता. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे जेवढ्या फरकाने पराभूत झाले, तेवढा आम्ही विचारदेखील केला नव्हता. विशेषत: तिरोडा व मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मतांचे अंतर अचंबित करणारे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर क्षेत्र वगळल्यास सर्वच ठिकाणी मतांचा कौल आमच्या बाजूने राहील, असे सर्वेक्षणातून वाटत होते. याबाबत मी स्वत:ही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्यता पडताळून पाहिली होती. परंतु हाती आलेला निकाल आम्हाला निरूत्तर करून गेला. ईव्हीएमबाबत बोलताना खासदार पटेल म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील दोन महिन्यात तब्बल तीनवेळा देशभरातील २२ राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र आमच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात निवडणुकीदरम्यान दुसरा पर्याय काय आहे, यावरही विश्लेषण व चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, नरेश डहारे आदी उपस्थित होते.
निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता- प्रफुल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 3:26 PM