Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:05 PM2019-05-23T12:05:42+5:302019-05-23T12:08:03+5:30
राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदी-शहांवर टीकेची झोड उठवली होती
मुंबई: 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन हटवा, असं आवाहन राज यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांनी नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, शिवडी, भांडूप, शिरुर, नाशिकमध्ये सभा घेतल्या होत्या. मात्र यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. दुपारी 12 पर्यंत राज्यातील 48 पैकी 44 जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार तीन मतदारसंघात आघाडीवर आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.
राज ठाकरेंच्या सभेचा काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज बांधला जात होता. राज यांनी सभा घेतलेल्या केवळ दोन मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. शिरुरमध्ये अमोल कोल्हे, तर रायगडमध्ये सुनिल तटकरे पुढे आहेत. पण या दोन्ही उमेदवारांकडे असलेली आघाडी अतिशय तुटपुंजी आहे. बारामतीत सुप्रिया सुळे जवळपास 70 हजार मतांनी आघाडीवर आहेत. मात्र या ठिकाणी राज यांनी सभा घेतलेली नव्हती. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या इतर सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपानं मुसंडी मारली. त्यामुळे राज यांच्या सभांचा कोणताही परिणाम न दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.