मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर भाजपानं आज पदाधिकारी, आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पराभवाचं विश्लेषण करत विरोधकांनी जे नॅरेटिव्ह तयार केलं त्यात ते यशस्वी झाले असं सांगत आगामी काळात ताकदीने जिंकू असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेनं समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आलं. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपलं सरकार आलं. मागील ३ निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मते ४३.०९ टक्के तर महायुतीला मिळालेली मते ४३.०६ टक्के आहेत. मतांमध्ये जास्त फरक नाही. पण त्यांना ३१ आणि आपल्याला १७, केवळ २ लाख मते महाविकास आघाडीला मिळालीत. मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला २४ लाख आणि महायुतीला २६ लाख मते आहेत. याचं विश्लेषण केले तर आपण केवळ ३ पक्षांशी लढत नव्हतो तर एका खोट्या नकारात्मक नॅरेटिव्हला आपण रोखू शकलो नाही असं त्यांनी सांगितले.
कोणते ४ नॅरेटिव्ह?
१) संविधान बदलणार
भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला त्याचा निकालावर परिणाम झाला. पहिल्या ३ टप्प्यापर्यंत आपण गाफील राहिलो. त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांमध्ये केवळ ४ जागा आपल्याला आहेत. दलित, आदिवासी समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झाला. जेव्हा जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नेता निवडीपूर्वी संविधानाच्या पाया पडले. संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होतायेत. त्यामुळे पुढील १ वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव देशात साजरा केला जाणार आहे असं मोदींनी सांगितले. त्यामुळे आता हा नॅरेटिव्ह जास्त काळ चालणार नाही.
२) पक्ष फोडाफोडी
जर त्यांच्या यशाचं विश्लेषण केले तर त्यांना कुठे मते मिळाली आणि कुठे नाही यातून हा नॅरेटिव्ह किती खोटा आहे लक्षात येईल. विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा नॅरेटिव्ह तयार केला. पण आश्चर्य वाटतं मराठा समाजाला दोन्ही वेळेला आपण आरक्षण दिले, महामंडळे, अनेक योजना या आपल्या काळातच झाल्या. मराठा समाजाचा फटका बसला पण ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मते गेली. याचा अर्थ नॅरेटिव्ह तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले. पण आपला मतदार सगळा गेला असता तर ४३ टक्के मते मिळाली नसती.
३) महाराष्ट्रातले उद्योग पळवले
महाराष्ट्रातले उद्योग पळवले हा तिसरा नॅरेटिव्ह तयार केला. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर २०२२-२३, २३-२४ या दोन्ही वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरात, कर्नाटक पुढे होते. परंतु आपल्या काळात गुजरात-कर्नाटक यांचं मिळूनही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र रोज खोटे बोलायचे, उद्योग पळवले बोलायचे जर उद्योग पळाले असतील तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात-कर्नाटकपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे कशी आली असती?
४) उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती
उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई, कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत उबाठाला एकही जागा मिळाली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर यात एकही जागा मिळाली नाही. मुंबईतल्या जागा कुणाच्या भरवशावर मिळाल्या हे आपल्याला माहिती आहे. मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असते तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली. शिवडीत ३०-४० हजार मताधिक्य घेऊ शकले नाहीत. मराठी माणसाने मतदान केले असते तर मराठी बहुल भागात उद्धव ठाकरेंना फार मोठे मताधिक्य मिळाले नाही. परंतु विशिष्ट समाजाच्या मतांवर एखाद्या विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या जागा आल्या. कोकणात उद्धव ठाकरेंना लोकांनी हद्दपार केले.