मुंबई - Devendra Fadnavis on Result ( Marathi News ) कधी कधी पराजय होतो पण पराजय झाल्यानंतर एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडू नका. आपल्यात काही समन्वयाचा अभाव आढळला. ते जाहीरपणे बोलायची गरज नाही. जिथे काही आढळले त्या त्या पक्षाच्या नेत्यांशी मी बोलणार आहे पण जाहीरपणे बोलण्याची वेळ नाही असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेना-राष्ट्रवादीसह स्वपक्षातीलही नेत्यांना दिला आहे.
मुंबईत आज भाजपा आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपली मदत मित्रपक्षांना झाली, मित्रपक्षांची मदत आपल्याला झाली. नॅरेटिव्ह तयार करण्याचं काम कुणीही करू नये. अनेकवेळा आपले प्रवक्ते, मित्रपक्षांचे प्रवक्ते यांनी समजून बोललं पाहिजे. आता ही वेळ जाहीरपणे बोलण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन चालणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले, आता वेगवेगळे विश्लेषण करू नका. सगळ्यांना एका सूरात बोललं पाहिजे. विरोधकांकडून महायुतीतील बातम्या पेरण्याचं काम होतंय, त्यामुळे अशी विधाने करणं ते पक्षासाठी योग्य नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्य १ लाख ९४ हजार मताधिक्य काँग्रेसला मिळाले. तिथे उर्वरित पाचही मतदारसंघात आपल्याला मताधिक्य मिळाले. केवळ ३ हजार मतांनी ती जागा हरली. राज्यातील ११ जागा केवळ ५ टक्क्यांपेक्षा कमी मतांनी हरलोय. जर त्यांना ३१ जागा मिळाल्या तर विधानसभेतही परिणाम दिसायला हवा होता. विधानसभेचा विचार केला तर भाजपाला ७१ आणि महायुतीला १३० जागांवर आघाडी आहे. ज्यांना ९ जागा लोकसभेच्या मिळाल्या ते सर्वाथाने एक नंबरला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मी थांबणार नाही, तुम्हीही थांबू नका
दरम्यान, विधानसभेच्या १३० जागांवर आपण आघाडीवर आहोत, त्यामुळे विधानसभेत हे चित्र बदलणं कठीण नाही. आपण ताकदीने पुढे गेलो तर मतांची टक्केवारी वाढेल. लोकसभेत जेवढी मते मिळाली त्यापेक्षा दीड टक्के मते वाढवण्यासाठी ताकद लावली तर विधानसभा आपण जिंकू. आपण सर्व ताकदीने मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फत्ते करू. माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. मी ज्यादिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्हीही थांबू नका असंही देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.