Maharashtr Lok Sabha Election Result 2024: सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी; उद्धव ठाकरेंच्या पैलवानाला किती मते पडली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:36 PM2024-06-04T15:36:02+5:302024-06-04T15:37:39+5:30
Loksabha Election Result - सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटात बिनसलं होतं. याठिकाणी ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. त्यामुळे मविआतील नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
सांगली - महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होती. या निकालात महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. तर महायुतीला मोठा फटका बसतानाची चिन्हे आहेत. त्यात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बराच वाद रंगला होता. याठिकाणी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना डावलून मविआने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती.
उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत येत घोषित केली. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले. त्याचेच रुपांतर विशाल पाटील यांच्या बंडखोरीत झाले. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीत भाजपाविरोधात दंड थोपटले. त्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत. त्याठिकाणी भाजपाचे संजयकाका पाटील आणि मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे.
विशाल पाटील यांना ५ लाख ५ हजार मते, संजयकाका पाटील यांना ४ लाख २० हजार मते तर मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ५५ हजार मते पडली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला. निवडणुकीच्या निकालांचे कौल आल्यापासून विशाल पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतली होती. या निकालावर विशाल पाटील म्हणाले की, अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे माझा प्रचार केला. पतंगराव कदम यांना मानणारा मोठा गट माझ्या पाठीशी होता. त्यांनी मला मोठं मताधिक्य दिलं. आर.आर पाटील यांच्या मतदारसंघातही मला मताधिक्य मिळालं. आर.आर पाटलांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते असं त्यांनी सांगितले.
तसेच अनिल बाबर यांच्या मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग माझ्या पाठीशी राहिला. विटा शहरात नगरसेवकांनी माझ्या पाठीशी राहिले होते. अनेकांनी धाडसानं माझं काम केले, मिरजमधून मला २५ हजारांचं मताधिक्य मिळालं. सांगलीत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहिले हे निकालातून दिसते. हा विजय जनतेचा आहे. ज्या लोकांनी माझं काम केले, त्यांना त्रास दिला गेला. या लोकांच्या पाठी मी उभा आहे. ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्याबाबत आकस नाही. मी सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून लोकसभेत काम करणार आहे असंही विशाल पाटील यांनी म्हटलं.