मुंबई - Naresh Mhaske meet Raj Thackeray ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यात निकालानंतर ठाण्यात २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे.
या भेटीबाबत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज राज साहेबांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
ठाण्यात म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव
ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा २ शिवसैनिकांमध्ये कडवी लढत होती. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक, आमदार हे शिंदेसोबत गेले तर तिथले तत्कालीन खासदार असलेले राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राजन विचारे यांना या निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवारी दिली होती. स्वत:उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली होती. मात्र या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. म्हस्के यांनी राजन विचारेंचा २ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव करत दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेलेत.