सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:59 PM2024-06-05T15:59:45+5:302024-06-05T16:01:07+5:30

Loksabha Election Result - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आलेत, मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसचा मोलाचा वाटा असल्याचं उघडपणे बोललं जातं. या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला

Lok Sabha Election Results - Vishwajit Kadam spoke on the victory of Sangli, Congress MP Vishal Patil | सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं

सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं

सांगली - सांगली जिल्ह्यातील लोकांसाठी, काँग्रेससाठी हा आनंदाचा क्षण आहे. विशाल पाटील तरूण तडफदार खासदार सांगलीला मिळाला आहे. आम्ही जिल्ह्यातील तरुण कार्यकर्ते, येणाऱ्या काळात जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. विशाल पाटील हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहे. ते काँग्रेसचे खासदार आहेत असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे.

विश्वजित कदम म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जनतेसमोर काय घडलं ते मी मांडलं आहे. व्यक्तिगत मला खूप त्रास झाला. वेगळ्या स्तरावर माझ्या पक्षश्रेष्ठीसमोर गैरसमज होतील असा संदेश पाठवला गेला. काँग्रेसला आणि पंजाला उमेदवारी मिळू नये यासाठी काहींनी कट केले. या सर्वांवर मात करून आता आम्ही पुढे भविष्यात काम करणार आहे. मला अजून खूप मांडायचे आहे ते योग्य वेळी मांडेन असंही त्यांनी सांगितले. 

तसेच  माझ्यावर कुठलेही दडपण नाही. पलूस कडेगावची लोक माझ्या पाठीशी आहेत. ज्या विमानात आम्ही बसलो, त्या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग हे पतंगराव कदम, वसंतदादा पाटील यांच्या विचारांचे आहे. हा विचार इतका मजबूत आहे त्याला कुणी धक्का लावू शकत नाही. विशाल पाटील हे महाविकास आघाडी घटक खासदार आहेत. आमचे काँग्रेसचे १४ खासदार महाराष्ट्रात आलेत. देशात १०० वी जागा विशाल पाटलांची आहे असं विश्वजित कदमांनी म्हटलं. 

त्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेने ३१ खासदार मविआचे निवडून दिले. हा कौल राहुल गांधीच्या नेतृत्वाचे आहे. जे फोडाफोडीचे, दबावाचे राजकारण करतायेत त्याला लोक कंटाळले. उद्धव ठाकरे, शरद पवारांचे पक्ष फोडले. त्यांना जो त्रास झाला हे महाराष्ट्रातील लोकांना मान्य झाले नाही. ४८ पैकी ३१ जागा आल्यात. उत्तर प्रदेशात राम मंदिराचे उद्घाटन केले. भाजपाच्या नेत्यांमध्ये जी अहंकार आला होता. त्या राज्यात ३७ खासदार समाजवादी पार्टीचे आले. सांगलीची जागा मिळावी यासाठी प्रयत्न मी केले. तरूण खासदाराला दुर्दैवाने उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांना राज्यसभेची ऑफर होती. त्यांना आम्ही वाऱ्यावर कधीच सोडले नाही. विशाल पाटील यांना लोकांचे प्रश्न माहिती आहे. विमानतळाचा विषय आहे. पाणी प्रश्न आहे. लोकसभेत ते आवाज उठवतील. आम्ही ताकदीने प्रश्न मार्गी लावू असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

सांगलीत १९९९ ची पुनरावृत्ती करणार

सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस विचारांचा आहे. १९९९ मध्ये पतंगराव कदमांनी पुढाकार घेतला त्यातून ९ पैकी ६-७ आमदार जिल्ह्यात निवडून आणले होते. त्याला इतिहास साक्ष आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील आणि आम्ही मिळून १९९९ ची पुनरावृत्ती करणार आहोत. ताकदीने चांगले उमेदवार देऊन त्यांना निवडून आणणार आहोत असा विश्वास विश्वजित कदमांनी व्यक्त केला. 

सांगलीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं - खासदार विशाल पाटील

सांगली देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. वसंतदादानंतर सांगलीला महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालं पाहिजे ही सामान्य सांगलीकरांची अपेक्षा आणि स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही पूर्ण करू इच्छितो. नजीकच्या काळात तुम्हाला या राज्याचं नेतृत्व सांगलीला मिळेल हे दिसेल असं सांगत खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे विश्वजित कदमांचं कौतुक केले. 

काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद

महाराष्ट्रातल्या सांगली लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण सुरुवातीपासून या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात वाद रंगला होता. कुठल्याही परिस्थितीत सांगलीची जागा लढवणारच असा चंग स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बांधला. मात्र ठाकरेंनी या मतदारसंघात चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. ती उमेदवारी मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ४ जूनच्या निकालात विशाल पाटील या मतदारसंघातून विजयी झाले. याठिकाणी ठाकरेंच्या चंद्रहार पाटील या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. इतकेच नाही तर विशाल पाटलांच्या विजयात काँग्रेसचा उघडपणे हात होता. विश्वजित कदम या विजयाचे शिल्पकार ठरले. विशाल पाटलांच्या विजयाच्या रॅलीत काँग्रेसचा गुलाल उधळलेला दिसून आला. 

Web Title: Lok Sabha Election Results - Vishwajit Kadam spoke on the victory of Sangli, Congress MP Vishal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.