"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:21 PM2024-05-24T14:21:48+5:302024-05-24T14:22:19+5:30

हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. 

Lok Sabha Election - Sanjay Shirsat commented on the controversy between Congress and Uddhav Thackeray group in Sangli | "सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा

"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा

छत्रपती संभाजीनगर - लोकसभेच्या मतदानानंतर आता ज्या ज्या लोकांनी छुपी युती आघाडी केली होती त्याची चर्चा सुरू आहे. त्याचा प्रत्यय सांगलीत विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आयोजित स्नेहभोजनातून आला. काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. विधानसभेला आम्ही काँग्रेसला धडा शिकवू अशी भूमिका तिथे उबाठा जिल्हाप्रमुखांनी घेतली. हीच आमचीही भूमिका होती. जे पक्ष आपल्या विचारधारेचे नाहीत, आपली विचारधारा त्यांना मान्य नाही त्यामुळे आपण त्यांच्यासोबत फरफटत जाण्यापेक्षा वेगळे झालेले चांगले, या आमच्या भूमिकेला सांगलीतील जिल्हाप्रमुखाने दिलेली पुष्टी आहे असा निशाणा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर लगावला. 

संजय शिरसाट म्हणाले की,  हे फक्त सांगलीत घडलं नाही, तर अनेक मतदारसंघात हे घडलंय. या लोकसभा निवडणुकीचा फायदा जर कुणाला होत असेल तर काँग्रेस आणि शरद पवारांना होणार आहे. पक्षाची वाताहत लावायचं काम संजय राऊतांनी केले त्याचा परिणाम काँग्रेस राष्ट्रवादीला फायद्यात होणार आहे. जो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा जयघोष करत आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढत राहिला. त्याला लाचारासारखं काँग्रेससमोर जावं लागलं हे दुर्दैव आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महायुतीत एखाद्या ठिकाणी हे झालं तिथे तात्काळ कारवाई केली. परंतु उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव आणि त्यांच्यावर आलेलं संकट पाहून आमच्या सारख्या कार्यकर्त्यालाही मनस्ताप होतोय. जर एकत्रित काम केले असते, आमची भूमिका मान्य केली असती तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती. हिंमतीने सांगलीच्या जिल्हाप्रमुखाने केलेले विधान उबाठाला मार्ग दाखवणारा आहे. हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. 

दरम्यान, डोंबिवलीत झालेली दुर्घटना ही दुर्दैवी, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. ६ महिन्याच्या कालावधीत ज्या अशा कंपन्या आहेत, त्यांना स्थलांतरित करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. रहिवाशी भागात केमिकल कंपन्या नको ही भूमिका सरकारने घेतले आहेत. त्यामुळे सहा महिन्यात या कंपन्या स्थलांतरित होतील अशी माहिती त्यांनी दिली. 

काय म्हणाले होते संजय विभुते?

महाराष्ट्रातील ४८ पैकी सांगली हा मतदारसंघ असा होता, जिथं पहिल्यापासून काँग्रेसनं गद्दारी केली. आम्ही सातत्याने वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो. हा वाद शिवसेना आणि काँग्रेसचा होता परंतु काही ठिकाणी राष्ट्रवादीनेही उघडपणे भाजपाचं काम केले. ७० टक्के राष्ट्रवादी सुरुवातीला विशाल पाटलांसोबत होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआ टिकवायची असेल तर तातडीने विशाल पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी होणार नाही. आम्ही वरिष्ठांना सांगितले, महाराष्ट्रात काहीही करा, पण सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी होणार नाही. एकवेळ पक्षाने आमची हकालपट्टी केली तरी चालेल पण काँग्रेसच्या या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेचे तोंडही पाहू देणार नाही अशी शपथ जिल्ह्यातील शिवसैनिकांनी घेतली आहे असं विधान उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election - Sanjay Shirsat commented on the controversy between Congress and Uddhav Thackeray group in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.