BJP Maharashtra ( Marathi News ) : महाराष्ट्रातील जागावाटपावरून महायुतीतील घटकपक्षांसोबत खलबतं सुरू असल्याने भाजपने आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र आता दुसऱ्या यादीत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या २० पैकी १३ उमेदवार हे जुनेच असून ७ नवीन उमेदवारांना यंदा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. तसंच भाजपने मागच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या पाच विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत.
भाजपने मुंबईत दुहेरी धक्कातंत्राचा अवलंब करत उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना संधी दिली आहे. तर उत्तर पूर्व मतदारसंघातून खासदार मनोज कोटक यांना बाजूला करत आमदार मिहीर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रातही भाजपने केलेल्या बदलाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जळगावमधून खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अकोल्यातून खासदार संजय धोत्रे यांना विश्रांती देत त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपने वेगळा निर्णय घेतला आहे. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना दूर करण्यात आलं असून त्यांच्या ज्येष्ठ भगिणी पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे, चंद्रपुरातही नव्या उमेदवारांना संधी
पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतूनही भाजपने नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने मागील अनेक महिन्यांपासून ही जागा रिक्त होती. आता पुण्यातून भाजपने शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर चंद्रपुरातून अनपेक्षितपणे राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात आलं आहे.