पुणे - Ajit Pawar on Sharad pawar ( Marathi News ) शरद पवारांच्या मनात असते, तोच निर्णय ते घेत असतात, ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना हवं तसं ते करतात असं सांगत अजित पवारांनीशरद पवारांच्या विधानावर टोला लगावला आहे. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पवारांनी सामुहिकरित्या निर्णय होईल असं म्हटलं होते. त्यावर अजित पवारांनी हे भाष्य केले.
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो निर्णय सामुहिक आणि चर्चा केल्यासारखं दाखवतात. परंतु त्यांच्या मनात असते तेच ठामपणे करतात. शरद पवार कुणाचं ऐकत नाही, ते हवं तसं ते करत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणं शक्य नाही असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, निलेश लंके याने पक्ष सोडला, पण पुन्हा त्याला पक्षात घेतले, त्यामुळे शरद पवार सांगतात, त्यात काहीही तथ्य नसते. राजकारणात कुणी कुणाचं कायमचं शत्रू आणि विरोधक नसते. संभ्रमावस्था, लोकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुलोदच्या वेळी जनता पक्षाचे १०० पेक्षा जास्त आमदार आले होते. ४० आमदार घेऊन शरद पवार बाहेर पडले, जनता पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले. आताही एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले, भाजपासोबत सरकार स्थापन केले. ती आणि आत्ताची घटना सारखीच आहे असंही अजित पवारांनी म्हटलं.
ते धादांत खोटे....
अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवतायेत हे धादांत खोटे आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका एकत्र बसून घेतो. कुणाच्या सांगण्याने राजकारण करणारी आम्ही नव्हे अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतली.
रोहित पवारांचं मानसिक संतुलन बिघडलं
रोहित पवारांकडून सातत्याने अजित पवारांविरोधात विधाने येत आहेत. त्यावर अजित पवारांनी रोहितचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे अलीकडे तो काहीही बडबडायला लागलाय असं सांगून त्यांची खिल्ली उडवली.
कोल्हे ५ वर्ष गायब, आढळराव लोकांच्या संपर्कात
जर शिवाजी आढळरावांचं काम नसतं, तर ते तिनदा निवडून आले नसते. चौथ्यांदा थोडक्या मतांनी पडले. ५ वर्षाचा अमोल कोल्हेंचा कार्यकाळ आणि आढळरावांचा कार्यकाळ तुलना करा. गेल्या ५ वर्षात आढळरावांनी चांगला जनसंपर्क ठेवला. मात्र निवडून आलेले खासदार राजीनामा द्यायला निघाले होते. लोकांना ५ वर्ष भेटलेच नाही. शिवाजी आढळराव पाटील कामाचा माणूस असून पराभूत होऊनही ते लोकांमध्ये संपर्कात होते. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी धडपड केली असं अजित पवारांनी सांगितले.