कल्याण - जो धर्मवादी आहे, जो भाजपासोबत पुन्हा जाणार नाही असं लिहून देणारा नाही अशा उद्धव ठाकरेंकडे कुठली वॉशिंग मशिन आहे, ज्यातून ते धर्मवादीतून सेक्युलरवादी झाले. ही कुठली वॉशिंग मशिन आहे ती आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सर्व धर्मवाद्यांना वॉशिंगमध्ये टाकून सेक्युलरवादी बनवू असा खोचक टोला प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
कल्याणच्या सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं फसवण्याचं राजकारण चाललं आहे. यातून जनतेनं वाचलं पाहिजे. मुसलमान उमेदवार दिला तर भाजपाला फायदा होईल असं उबाठा, काँग्रेसमध्ये चर्चा होती. संसदेत ५४३ जागा आहेत. राज्यात फक्त ५ ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभे राहिलेत. ४ मुंबईत आणि १ कल्याणमध्ये उभे राहिलेत. तुम्हाला भाजपाला झोपवायचे असेल ५४० मतदारसंघात झोपवा असा टोला त्यांनी लगावला.
तसेच उबाठा सेनेचा कल्याणमधील उमेदवार खरेच लढणारा आहे की नुराकुस्तीचा आहे हे सांगा. ही नुराकुस्ती आहे. एकनाथ शिंदेंसोबत समझौता झाला असून उद्या निकालानंतर ठाकरे-शिंदे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे. चर्चा सुरू झालीय. नरेंद्र मोदी काय म्हणाले हे ऐकलं, उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसवाल्यांनी उबाठा सेनेसोबत फारकत घेतली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आपल्याला फसवलं हे काँग्रेसला लक्षात आले आहे. भाजपासोबत ठाकरेंशी चर्चा झाली आहे. जर यांना काही कमी पडले किंवा त्यांना काही कमी पडले तर हे एकत्र येऊ शकतात असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.
दरम्यान, काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादीने मुस्लीम उमेदवार दिले नाहीत. पण आम्ही कल्याण आणि मुंबईतील ४ मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे आम्हाला भाजपाला हरवायचं आहे यापेक्षा आम्हाला मुस्लीम उमेदवार जिंकवायचे आहे असा विचार करा. हा मुस्मील उमेदवार जिंकून संसदेत पोहचेल आणि तुमचा आवाज बुलंद करेल. तुम्ही या गोष्टीचा चर्चा का करत नाही? असंही आंबेडकरांनी विचारले.