पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले, प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली मात्र काँग्रेससारख्या इतकी वर्ष जुना असलेल्या पक्षाला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार सापडला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे मतदानाची तारीख जवळ आली, इतर पक्षाच्या विरोधी उमेदवारांचे अर्जदेखील दाखल झाले तरीही पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही.
पुणे शहर काँग्रेस कार्यालयात जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारही सुरु केला आहे मात्र पक्षाचा उमेदवार कोण हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. अरविंद शिंदे, सुरेखा पुणेकर तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाडही पुणे लोकसभा जागेसाठी इच्छुक आहेत. मात्र इच्छुक उमेदवारांपैकी कोणत्याचा नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरु असला तरी आपण नेमका कोणत्या उमेदवाराचा प्रचार करतोय याचं उत्तर काँग्रेसचे नेतृत्वच कार्यकर्त्यांना देऊ शकतं.
शिवसेना-भाजपा युती होऊन भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करत पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बापट यांचा निवडणूक प्रचारही सुरू झाला असून अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी युतीचे नेते धडपडत आहेत. तर दुसरीकडे आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या कोट्यात असल्याने याठिकाणी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा राजकीय पक्षांपासून कार्यकर्त्यांपर्यंतच्या पुणेकरांमध्ये रंगली आहे. इतकचं काय सोशल मिडीयावरही पुणे काँग्रेसचा उमेदवार घोषित करण्यावरुन अनेकांनी काँग्रेसची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी संजय काकडे भाजपामध्ये नाराज असून काँग्रेसकडून पुणे लोकसभा जागा काकडे लढवतील अशी चर्चादेखील होती. मात्र रातोरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांची समजूत काढत काँग्रेसच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी साधला. त्यामुळे संजय काकडे हे भाजपात राहून गिरीश बापट यांच्या उमेदवारीचा प्रचारही सुरु केला. त्यामुळे काँग्रेसचा पुणे येथील उमेदवार कोण असणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसोबतच पुणेकरांना लागून राहिली आहे.