लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यभरात सभा सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पालघर दौऱ्यावर होते. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया! डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया? "हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया! डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया? "हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया...."
"यांना भरलंया न्यारं पिसं, हे पाही ना रातंदिस, सोळा करुन गोळा बसं, कोण तुतारी घेऊन येतं, कोण मशाल पेटवून असं, मोदी-मोदी करीत बसलंया... "घमेंडिया" मध्ये फसलंया... हाताला धरलंया म्हणिते आमचं गणित ठरलंया? मन नाही यांच स्थिर, यांना राहिला ना धीर, जागांची किरकिर, हरण्याची घाई फार, मोदींच्या भीतीनं घेरलंया, यांना भीतीनं घेरलयां... हाताला धरलंया म्हणिते गणित ठरलंया! डोकं फिरलंया, आघाडीचं डोकं फिरलंया? (लोककवी मधुकर घुसळे यांची क्षमा मागून)" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.