सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:49 PM2024-04-03T15:49:25+5:302024-04-03T15:51:29+5:30
Loksabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला आहे. परस्पर ठाकरेंनी उमेदवार जाहीर करणं योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम आहे.
सांगली - Sangli Loksabha Seat Controversy ( Marathi News ) महाविकास आघाडीतसांगलीच्या जागेवरून तिढा वाढतच चालला आहे. ७ मे रोजी इथे मतदान होणार आहे. परंतु अद्याप मविआतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही. त्यात चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. काँग्रेसच्या बैठकीवर नेत्यांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणतात की, सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला, आज तिथे स्थानिक स्वराज्य संस्था, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद सगळीकडे काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादीचीही ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला द्यावी असा आमचा आग्रह होता. ठाकरेंनी उमेदवार जाहीर करण्याअगोदर आमची मते घेतली तर योग्य ठरलं असते. सांगली काँग्रेसला मिळावी हा आमचा हट्ट आहे. सांगलीबाबत जो काही निर्णय असेल तो महाविकास आघाडीने एकत्रितपणे जाहीर करावा. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बैठकीला जाणं मला योग्य वाटलं नाही म्हणून गेलो नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच सांगलीत आज काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून विशाल पाटील तयारी करतायेत. त्यामुळे हे जागा काँग्रेसला मिळावी अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस नेत्यांच्या भावना आम्हाला माहिती आहे. जिल्हा काँग्रेसचा आहे. सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय होता जेव्हा ठाकरे गटाने ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अद्यापही सर्वांच्या चर्चेने इथला उमेदवार जाहीर करावा. १ महिना बाकी आहे. काँग्रेस नेते आणि मविआ संयुक्तपणे निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत सांगलीची जागेबाबत आम्हाला आशा आहे. किती दिवसांत हा निर्णय द्यायचा हे पक्षश्रेष्ठीने ठरवावं. ७ मे ला मतदान आहे. ५ मे रोजी प्रचार थांबेल. आता महायुतीकडून उमेदवार जाहीर होऊन प्रचार सुरू झाला आहे अशी आठवण विश्वजित कदमांनी करून दिली.
दरम्यान, ज्यावेळी मविआचे तिन्ही पक्षाचे नेते चर्चेला बसलेले होते. तेव्हा कोल्हापूरच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढणार असतील तर ते जो पक्ष निवडतील ती जागा त्या पक्षाला सोडायची असं ठरलं होते. शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला. काँग्रेसनं घटकपक्षाला विचारून ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोल्हापूरचा सांगलीशी संबंध जोडणं योग्य नाही. कोल्हापूर, सांगली इथं आमची ताकद आहे. शाहू महाराजांनी मविआकडून लढणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे असंही कदमांनी स्पष्ट केले.
वसंतदादांचं योगदान विसरून चालणार नाही - रोहित पाटील
सांगलीबाबत अद्याप कुठला निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीची आज एकत्रित बैठक होती. मविआत जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. काँग्रेस आपली भूमिका मांडतेय. आम्ही आमची भूमिका मांडली. ठाकरे गटाला ती जागा हवी. एकंदरीत सगळी ताकद, पक्षाचे अस्तित्व लक्षात घेता मविआत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. सांगलीच्या बाबतीत वसंतदादांचे योगदान विसरून चालणार नाही. कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घ्यायला हवी. सर्वसामान्य मतदारांचे मत काय आहे हेदेखील आम्ही कळवलं आहे. त्यातून सर्वसमावेशक निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं काँग्रेस-राष्ट्रवादी जुळत नसल्याचं समोर आले आहे.