लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाई पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याच दरम्यान आता पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत पूजा तडस देखील उपस्थित होत्या.
"मला एका प्लॅटमध्ये टाकलं गेलं, तिथे मला ज्या प्रकराची वागणूक मिळाली ती अपमानास्पद होती. ज्या प्लॅटमध्ये मी राहते, तिथे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. मला बाळ झालं त्यावेळी तडस परिवाराकडून हे बाळ कोणाचं? असं विचारण्यात आलं. या बाळाची डीएनए टेस्ट कर, असं सांगण्यात आलं. प्रत्येक वेळी मला अपमानास्पद वागणूक मिळाली. प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावण्यात आले."
"जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा मला लोखंडी रॉडने देखील मारण्यात आलं. याचे पुरावे मी सर्वांना देणार आहे. एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. मी ज्या प्लॅमध्ये राहते तो प्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण घडतं. माझ्यासारख्या मुलीने मग जायचं कुठे?" असा सवाल पूजा तडस यांनी विचारला आहे.
रामदास तडस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका आल्यावर गंभीर आरोप होतात असं म्हटलं आहे. "निवडणुका आल्यावर गंभीर आरोप होतात. त्यांची कोर्टात केस सुरू आहे. मुलगा आणि मुलगी यांनी लग्न केलं हे देखील मला माहीत नाही. माझा यामध्ये काही संबंध नाही. ती आमच्यासोबत राहत नाही. तिने तिच्या नवऱ्यासोबत राहावं. कोर्टात केस सुरू आहे त्यामुळे मला याचं काही देणं-घेणं नाही. त्यांनी त्यांचं पुढे पाहावं" असं रामदास तडस यांनी म्हटलं आहे.
पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. "माझा विवाह रद्द करण्यासाठी मी न्यायालयात दाद मागितली आहे. कोर्टात देखील हे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यामध्ये जास्त बोलू इच्छित नाही. विरोधी नेत्यांना हाताशी घेऊन यांना फक्त माध्यमात प्रसिद्धी मिळवणं आणि तडस कुटुंबीयांना बदनाम करणं हाच यांचा डाव आहे. माझ्या परिवाराला हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा हा प्रयत्न आहे" असं पंकज तडस यांनी म्हटलं आहे.