यवतमाळ - Aaditya Thackeray on MNS-BJP ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु अलीकडेच युतीच्या चर्चांना ब्रेक लागला. मात्र यावर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मनसे-भाजपात युती होईल असं त्यांनी म्हटलं.
यवतमाळमध्ये पत्रकारांनी मनसे-भाजपा युतीवर प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, उत्तर प्रदेशातील २ टप्प्यानंतर मनसेला सोबत घेतले जाईल अशी भाजपाकडून चर्चा आम्हाला ऐकायला आलीय असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही जाहीर केलेत. महायुतीत ईडी, सीबीआय, भ्रष्टाचारांची गँग आहे तिथे जागावाटपावरून बोली सुरू आहे. मिंदे गटातील ४-५ उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. अजून पुढे अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. आमची निष्ठा महाराष्ट्राची आणि देशाची आहे. देशहित, महाराष्ट्र हित बघून आम्ही पुढे चाललोय असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय आम्ही सर्वसामान्यातले आहोत. आमच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तरुण मंडळींना सोबत घेऊन वरिष्ठांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जो निर्णय दिला तो पाहिला तर देशात संविधान बदलण्याचे संकेत मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेवून भाजपाचे संविधान देशावर लादायचं आहे. हे आम्ही करून देणार नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक झाली. Join किंवा Jail अशी ऑफर येत आहे. त्यातून जगभरात भारताची बदनामी होतेय. ईडी, सीबीआय कारवाईतून देश बदनाम होतोय. त्यामुळे इंडिया आघाडीची वज्रमूठ बाहेर आली आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपावर केली.
दरम्यान, आताच मिंदेंनी दिलेले उमेदवार बदलायला सांगितले आहेत, त्यातून पुढे ४० गद्दारांनी विचार करावा. महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं आहे. राज्यात असं राजकारण कधीच झालं नव्हतं, जातीधर्मात भांडणं लावली जातेय. पक्ष पोडणे, कुटुंब फोडणे यातून महाराष्ट्रात मिळवलं काय? अडीच वर्षात एकही उद्योग राज्यात आणला नाही. शेतकरी त्रस्त आहे. मग हे राजकारण कुणासाठी आणलं? आमची राज्यासाठी जी तळमळ आहे, देशात जे राजकारण सुरू आहे. ५० वर्षापूर्वी जे झाले तो इतिहास आहे, भविष्यावर बोलणार की नाही. काँग्रेसनं काय केले यावर प्रचार सुरू आहे. आपण ज्या पदावर आहोत तिथे पुढे देशासाठी काय करणार याचा विचार करायला हवा असं सांगत आदित्य ठाकरेंनी काँग्रेसवरील आरोपांना उत्तर दिले.