Lok Sabha Elections 2024: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; सर्वाधिक जागा....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:28 AM2023-03-16T11:28:33+5:302023-03-16T12:35:31+5:30
पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
मुंबई - अलीकडेच राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. मविआच्या या विजयानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनुसार, ४८ जागांपैकी ठाकरे गटाला २१, राष्ट्रवादी १९ तर काँग्रेस ८ जागांवर निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील ६ जागांपैकी ठाकरे गटाला ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा लढवण्यास मिळू शकते. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी ५-६ जागा अशा आहेत त्याठिकाणी महाविकास आघाडीचे एकमत झाले नाही. त्यासाठी या जागांवर बदल होऊ शकतो. भाजपाने तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी भाजपा नेते कामाला लागले आहेत. त्याचसोबत केंद्रीय मंत्र्यांवरही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनं फेटाळली चर्चा
दरम्यान, महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटप फॉर्म्युला ठरला नाही. ही सर्व हवाई पुलाव आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नाही. मी २ दिवसांत दिल्लीला जाणार आहे. या सर्व चर्चा केंद्रीय नेतृत्वासमोर करू. मग महाराष्ट्रात पुढे काय करायचं यावर आम्ही येथील नेत्यांमध्ये चर्चा करू. परंतु जागावाटपाबाबत काही ठरले नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही चर्चा फेटाळली आहे.
२०१९ च्या लोकसभेचं गणित काय?
महाराष्ट्रात ४८ जागांवर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. २०१९ मध्ये ४८ पैकी २३ जागांवर भाजपाने विजय मिळवला तर १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर राष्ट्रवादीने ४ जागा आणि काँग्रेसने १ जागेवर विजय मिळवला. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. त्यात शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यावर भाजपाची नजर आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त निवडून आणण्याचे टार्गेट पक्षातील नेत्यांना दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची प्रत्येक योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचवा असं निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.