लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे. "मी असं का करू? माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला आहे. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे" असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच "आमचं हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे. भाजपाचं हिंदुत्व हे घर जाळणारं आहे."
"आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. फक्त देशद्रोही म्हणजेच देशाशी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात आहोत. भाजपा म्हणते चार जाती आहेत - तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. तरुणांना नोकऱ्या कुठे आहेत? शेतकऱ्याच्या म्हणण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांना मणिपूरमधील महिलांवरील गुन्ह्यांची माहितीच नव्हती, असे दिसते. तुम्ही गरिबांना गरिबीत ठेवता" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.
"मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शिवसेना-भाजपाचा अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होईल, यावर अमित शाह यांच्यासोबत एकमत झालेलं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि नंतर दिल्लीला जाऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मला आज भाजपाचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.