मुंबईमध्ये इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, 100 वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. "भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहील. आता एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात, भाजपा स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे."
"आरएसएसला 100 वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो" असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. "भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. भाजपाने दहा वर्ष महाराष्ट्राला बदनाम केलं."
"मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. चार जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिनची सुरुवात होणार आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी "नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली" असं म्हटलं आहे.
"खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही. देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करू" अशा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला आहे.