अहमदनगर - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) ऐन निवडणुकीत नाशिकचे आमचे नेते, ज्यांच्या हाती प्रचाराची सूत्रे आहेत, त्यांना तडीपारीची नोटीस देताय. मात्र जे गुंड आहेत त्यांना जेलमधून सोडवलं आहे. ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीसोबत फिरतायेत. ४ जूननंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील अशाप्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत, लिहून ठेवा असा इशारा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांच्यावर इतके अपराध आहेत, त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाईल असे गुन्हे आहेत. ज्या गुन्ह्यासाठी ते ईडीला घाबरून पळून गेले. तीच ईडी त्यांच्या मागे लागेल. त्यांना कुणीही वाचवणार नाही. मोदी-अमित शाह-फडणवीस कुणी येणार नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं त्यांनी म्हटलं.
तसेच एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं ही गमंत आहे. घोटाळे बाहेर पडतायेत, मला अटक होईल या भीतीने ज्यांचे पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले हा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो हे आश्चर्य आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेता, जो प्रचारात आघाडीवर आहे त्याला तुम्ही तडीपारीची नोटीस देता, निवडणुकीसाठी तुम्ही तडीपार गुंड जेलमधून बाहेर काढता याला काय म्हणायचं असा सवालही राऊतांनी केला आहे.
दरम्यान, आम्ही झेंडे उचलणार नाही, भाजपाची अंत्ययात्रा उचलू. मोदी निवडणूक हरतायेत. ४ जूननंतर भाजपा सत्तेवर नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची खुर्ची वाचवावी. आम्ही आमचा पक्ष संकटात वाढवला आहे. जुने जातात, नवीन येतात. पक्ष वाढत असतो. आमच्याकडे आत्मविश्वास आहे. लोकांवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे पक्षनेतृत्व हे पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम आहे असंही संजय राऊत यांनी सांगितले.