शिरूर - Ajit Pawar on Sharad Pawar ( Marathi News ) एका उद्योगपतीच्या दिल्लीतील घरी ६ बैठका झाल्या, तिथून मी मुंबईतल्या परतल्यानंतर आपण भाजपासोबत नको, शिवसेनेबरोबर जावू असं शरद पवार म्हणाले, आपण ६ बैठका भाजपासोबत केल्या, त्यांना शब्द दिला, पवारसाहेब बोलले, ते जाऊ द्या इकडेच जावू, मी दिलेला शब्द पाळला, ७२ तास का होईना मी सरकारमध्ये गेलो. ते सरकार चालले नाही परंतु मी शब्द पाळला असं गुपित पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी उघड केले आहे.
शिरुरच्या प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की, मी अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना सांगितले, माझ्या समक्ष हे सर्व ठरलेले आहे, त्यामुळे मी शब्द पाळलेला आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहे त्यात दुमत नाही. परंतु कुठेतरी एक काळ असतो, ८० वर्षानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. फक्त मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला विचारला.
तसेच यशवंतराव चव्हाणांनी संधी दिल्यानंतर ११ वर्षातच शरद पवारांनी त्यांना सोडले. त्यांना काय वाटले असेल? ती संधी मिळाल्यामुळेच शरद पवार आज इथपर्यंत पोहचले. आम्हालाही संधी मिळाली, परंतु संधी एकदाच मिळते तुम्हाला काम करावे लागते. लोक साहेबांचा पुतण्या आहे म्हणून त्याला मत द्या असं करतील का?, पहिले ५ वर्ष मला बारामतीकरांनी दिली, त्यानंतर मी माझे काम दाखवले असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी काही चुकीचे केले नाही, भावनिक होऊ नका. परदेशी मुद्द्यांवर काँग्रेस सोडली, जूनमध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि ४ महिन्यात आम्ही काँग्रेससोबत गेलो. ही आपली रणनीती असल्याचं ते म्हणतात, ३०-३२ वर्ष मी कधीही शब्द मोडला नाही. जे सांगेल ते करत गेलो. वयाच्या ६० नंतर आम्हाला संधी देणार की नाही. आम्ही काय चुकीचं वागलो का? त्यामुळे भावनिक होऊ नका असं आवाहनही अजित पवारांनी जनतेला केले.