मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असून, सेना-भाजप युतीचा निर्णय तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे दिसत आहे. मात्र युतीचा फॉर्म्युला हा लोकसभा निवडणुकीच्या आधीच ठरला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्ता आणि उमेदवारीच्या जागांमध्ये समान वाटप असा हा फॉर्म्युला ठरला असून, दोन्ही पक्ष यावर कायम असल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केला. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा युती होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून होताना दिसत आहे. परंतु जागावाटपाचा आकडा अजूनही ठरला नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलेला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सत्तेत आणि जागावाटपात समान वाटप असा फॉर्म्युला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असतानाच ठरला असल्याचे राऊत म्हणाले. विशेष म्हणजे हा फॉर्म्युला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आला असल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केला आहे.
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत समान वाटपाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्ष वेगळे लढले होत. मात्र यावेळी असे होणार नाही. आता भाजप-शिवसेनेत कोणतेही वाद नसून, दोन्ही पक्षाने एकत्र राहण्याचे ठरवले असल्याचे राऊत म्हणाले. आता आमचं पण ठरलं अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युतीचा समान वाटपाचा निर्णय झाला असल्याचा राऊत यांच्या दाव्याशी भाजप सहमत होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.