मुंबई - Anandrao Adsul on Gajanan Kirtikar ( Marathi News ) लोकसभा निवडणूक संपताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाचे फटाके फुटत आहेत. त्यात गजानन किर्तीकरांच्या विधानांवरून नाराज शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. त्यावर आता गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर आम्हीही विचार करू. आम्हीही शिवसैनिक, चुकीच्या गोष्टी आम्ही सहन करत नाही असं म्हणत किर्तीकरांच्या समर्थनार्थ आनंदराव अडसूळ पुढे आले आहेत.
आनंदराव अडसूळ म्हणाले की, गजानन किर्तीकरांवर जो आरोप होतोय, त्यांनी मुलाला मदत केली. क्षणभर आपण समजलं मदत केली असेल, एका घरात राहतायेत.आपण मुलाला जन्म दिलाय, वारसा हक्काने त्याला सगळं द्यायचा प्रयत्न करतो. जरी तात्विक वाद असले तरी मुलाला मदत केली पाहिजे हे वाटणं चुकीचे नाही. मदत केली की नाही हे सांगता येत नाही. पण ते चुकीचे आहे हेदेखील वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच चळवळीत काम करणारी व्यक्ती दगा देईल हे मी तरी मान्य करणार नाही. फॉर्म भरायचा आणि त्यानंतर मागे घेणार अशी भावना तुम्ही एखाद्यावर लादणार असाल तर ते बरोबर नाही. किर्तीकर बोलले, मुलगा असून मला त्याचा प्रचार करता आला नाही ही खंत वाटणे गुन्हा आहे का?. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. शिशिर शिंदे आहे कोण?, गजानन किर्तीकरांनी चळवळीतून काम केले आहे. शिशिर शिंदे कोण त्यांनी किर्तीकरांवर कारवाई करावी म्हणावं, आधी मनसे, शिवसेना आणि त्यानंतर या शिवसेनेत आलाय त्याला अधिकार काय? असा घणाघातही आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदेवर केला.
दरम्यान, संपूर्ण राज्यातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल हे आपल्याला स्वीकारावं लागेल. विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करतायेत. या एकजुटीचा थोडाफार फटका महायुतीला बसेल असं विधानही अडसूळ यांनी केले आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं हे महायुतीतील सर्व पक्षाचं कामच आहे. गजानन किर्तीकरांचे विधान आणि त्याआधारे घेतलेली भूमिका ही महायुती धर्माला छेद देणारी आहे आम्ही त्याचा निषेध आणि विरोध करतो. गजानन किर्तीकरांवरील कारवाईचा विषय हा शिवसेनाएकनाथ शिंदे पक्षाचा अंतर्गत असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे असं भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं होते.