मुंबई - महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपताच महायुतीच्या मित्रपक्षातील अंतर्गत कलह समोर येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा आरोप केला आहे तर बारणे त्यांनी स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप लावू नये असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, मतदारांमध्ये श्रीरंग बारणे यांच्याविरोधात असंतोष होता हे सत्य श्रीरंग बारणे यांना स्वीकारावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं बारणे यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बारणे यांनी स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आरोप किंवा त्यांच्यावर टीका करू नये असं त्यांनी म्हटलं.
दुसरीकडे मुंबई उत्तर पश्चिममध्ये अप्रत्यक्षपणे गजानन किर्तीकर ठाकरेंच्या बाजूने विधाने करत असल्याने एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उपनेते शिशीर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खासदार गजानन किर्तीकर यांच्या पक्षविरोधी विधानांची दखल घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
खासदार गजानन किर्तीकर सातत्याने मतदानानंतर विरोधी वक्तव्ये करत उद्धव ठाकरेंची बाजू घेत आहेत. मातोश्रीचे लाचार असणाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिमची उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीत अमोल किर्तीकर वडिलांच्या कार्यालयाचा वापर त्याच्या प्रचारासाठी करत असल्याचं आरोप करण्यात येत आहे. गजानन किर्तीकर यांच्या पत्नीनेही मुख्यमंत्र्याबाबत अपमानास्पद विधान केले असंही पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या घरातील राजकीय वातावरण पाहिले तर ते एका साईडला आहेत. यावेळी शांततेची भूमिका घ्यायला हवी होती, स्थानिक पातळीवर बोलणे योग्य, त्यांच्या बोलण्याने चर्चा करायला वाव मिळू नये त्यांनी असे भाष्य करू नये. घरातील वादविवादाने मानसिक त्रास होतो. त्यांचं ऑपरेशन झाले तेव्हा एकनाथ शिंदे भेटायला गेले होते. आम्ही भावनिक नातं जपतो. या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.