सांगली - Congress vs Uddhav Thackeray in Sangli ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर राज्यातील राजकीय प्रचार संपलेला आहे. आता सर्वच उमेदवारांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्यातच निवडणुकीनंतर इथल्या काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केले होते मात्र या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेल्या हजेरीनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांच्या हजेरीनं ठाकरे गटही संतापला आहे. त्यामुळे आयोजक आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, काँग्रेस जिल्हाध्यक्षाने घेतलेलं स्नेहभोजन आणि त्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेली हजेरी हा अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे. विशाल पाटील यांचीही हकालपट्टी काँग्रेसनं केली नाही. याचा अर्थ गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांसोबत उभी होती हे आहे का असा सवालही ठाकरे गटाने केला.
तर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घटना सांगलीत घडल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते. प्रचारानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन ठेवले होते. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते उत्साहाने, जोमाने कामाला लागले पाहिजेत यासाठी आयोजित केले होते. दुसरे कोणतेही उद्दिष्टे त्याठिकाणी नाही असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, सांगलीत काँग्रेस कधीच उबाठा गटासोबत नव्हती. उबाठाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचे काम केले. हे सर्व सांगलीकरांना माहिती आहे. त्यामुळे उबाठा गटानं काय मागणी केली त्याकडे काँग्रेस लक्ष देणार नाही. स्नेहभोजनासाठी एकत्रित आलेल्या सर्वांनी ठरवूनच विशाल पाटलांचे काम केले होते. काँग्रेस उबाठासोबत नव्हतीच असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
काय आहे प्रकार?
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा जागा आम्हाला द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी कुणालाही विचारत न घेता याठिकाणी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक नेते आग्रही होते. मात्र ठाकरेंनी उमेदवार मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा इथले काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे काम केल्याचं सांगलीत उघडपणे बोलले जाते.