शिरुर - सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादीत २ गट पडल्यानं शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातील नेते एकमेकांवर तुटून पडलेत. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते असा आरोप अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. त्यावर जयंत पाटील, अमोल कोल्हेंनी मोहिते पाटील यांच्यावर घणाघात केला.
दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवारांकडून आमची अपेक्षा होती. इतकी वर्ष केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती. केंद्रात कृषीमंत्री होतात. त्यावेळी एखादा कायदा करून ठेवला असता तर कांदा, दुधाचे दर आज कोसळले नसते. तुमचे सगळे ऐकत होते. मी तुमच्या पक्षाचा ३ वेळा आमदार होता. पण तुम्ही कधीतरी बसून बाबा, तुझ्या मतदारसंघाचे काय काम आहे असं विचारलं नाही. जर तुम्ही मदत केली असती तर आमच्या तालुक्याचा चेहरामोहरा बदलला असता असं त्यांनी म्हटलं.
तर शरद पवारांनी देशाच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल केले त्यामुळेच आज देश निर्यातीपर्यंत पोहचला. आता कांदा निर्यात करण्याऐवजी तुमचं सरकार निर्यात बंद करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का? तुम्ही निर्यातबंदीला विरोध का केला नाही. तुम्ही भाष्य का केले नाही, तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना भेटून निर्यातबंदी उठवण्याची मागणी का केली नाही. तुम्ही सत्तेत जाऊन बसल्याने तुम्हाला आता बोलण्याची सोयच नाही असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीप मोहिते पाटलांना दिलं.
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असताना मंत्र्यांचा पोरगा शेतकऱ्याला गाडीखाली चिरडतो. याला जनतेशी गद्दारी म्हणतात, पेट्रोल १०० च्या पार आणि गॅस हजाराच्या वर जातो, तेव्हा त्याला जनतेच्या विश्वासाची गद्दारी म्हणतात. ही गद्दारी उघड्या डोळ्याने दिसत असताना केवळ स्वार्थासाठी, त्यांची पालखी वाहण्यासाठी याला महागद्दारी म्हणतात असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटलांना लगावला.