परभणी - राज्यात महायुतीला माहिती नाही पण मविआला ३० ते ३५ जागा मिळतील. त्यात उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील असं विधान परभणी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात मराठा ओबीसी वादाला भाजपाच जबाबदार असल्याचा आरोपही जाधवांनी केला.
संजय जाधव म्हणाले की, राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील मी आढावा घेतला तेव्हा यावेळची लढाई ही उद्धव ठाकरेविरुद्दमहायुती अशी होती. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते असतील यांनी ज्यारितीने महाविकास आघाडी म्हणून प्रचार केला. त्यामुळे उद्याच्या ४ तारखेला या निकालाचा मॅन ऑफ द सिरिज कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. महायुतीच्या जागा किती असतील माहिती नाही. परंतु महाविकास आघाडी किमान ३५ जागा निवडून येईल हे मी आत्मविश्वासाने सांगतो असं त्यांनी म्हटलं.
...तर वाईट वाटण्याचं कारण काय?
महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांनी समाजासाठी लढा दिला. सगळ्या समाजाने प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव आणून त्यांना हवं ते पदरात पाडलं, मग मराठा समाजाने जर लढा दिला तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे. जर काही गोष्टी हव्या असतील तर आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. मराठ्यांनी हक्क मागू नये का? सगेसोयरे अंमलबजावणी का करत नाही? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी चुकीची आहे का? मराठा समाजात आज चूल पेटायचे वांदे आहेत असं संजय जाधव यांनी सांगितले.
जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्या अशी मागणी आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते बाळासाहेब ठाकरेंची होती ती आजची परिस्थिती आहे. आम्ही कुणाचं हिसकावून मागत नाही. परंतु मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षणाची गरज आहे. सुशिक्षित लोकांचे आरक्षणामुळे नुकसान झालं त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आम्ही मागणी करतोय असं त्यांनी म्हटलं.
भाजपावर जातीवादाचा आरोप
ही पहिली निवडणूक होती, विकासाच्या मुद्द्यावर न लढता ओबीसीविरुद्ध मराठा अशी लढली गेली. जातीच्या आधारे वळणावर निवडणूक गेली. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर हेवेदावे संपायला हवे होते. निवडणुकीमुळे कटुता आणि टोकाला जायची गरज नव्हती. ही लढाई वैचारिक असते. परंतु निवडणूक जातीवर गेली. भाजपाचे नेते, जे संवैधानिक पदावर आहेत त्यांच्यामुळे हे झाले. देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी ओबीसीतून येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, आमच्या पक्षाचा डिएनए ओबीसी आहे, त्यामुळे हे झाल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला.