मुंबई - Prakash Mahajan on Sushma Andhare ( Marathi News ) आधी दलित चळवळीची सुपारी घेतली, त्यानंतर राष्ट्रवादीची सुपारी घेतली. त्यानंतर आता उबाठाची सुपारी घेतली. घे बोकांडी कर दहिहंडी असं बोलणाऱ्या याच सुषमा अंधारे आहेत. प्रभू श्री रामांबाबत, हनुमानाबाबत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराजांबाबत वाट्टेल त्या पातळीवर अंधारेंनीच भाषा केली असा घणाघात करत होय आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाची, महाराष्ट्राच्या हिताची असा पलटवार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंवर केला आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गुरुशिक्षाचे नाते होते. कोकण दौऱ्यावर राज ठाकरे निघाले असताना बाळासाहेबांनी राज यांना फोन केला, उद्धवला रुग्णालयात दाखल केलंय. तशीच गाडी राज यांनी फिरवली आणि माघारी मुंबईला गेले. उद्धव ठाकरेंवर पूर्ण उपचार होईपर्यंत तिथे थांबले, त्यानंतर रुग्णालयातून घरी जात मातोश्रीला सोडले हे सुषमा अंधारेंना माहिती आहे का? मुंबईत महापूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडलं होते. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी बाळासाहेबांना सुखरुप कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आणलं होते. तेव्हा हे लोक पंचतारांकित हॉटेलला जाऊन राहिले होते. ज्या लोकांना हे माहिती नाही ते उठसूठ टिका करायची आणि टाळ्या मिळवायच्या ही अशी भाषा केली जाते. वाईट म्हणजे उबाठा ही अंधारेंची म्हणून खेडेगावात ओळखली जाते हे उद्धव ठाकरेंनी कमावलं आहे. ही आमची अवस्था झाली नाही असा टोला त्यांनी लगावला.
तसेच सुषमा अंधारे या प्रोफेशनल पॉलिटिक्स करणाऱ्या आहेत. सुपारी घेऊन उबाठा गटाचं बीड जिल्हाप्रमुखपद कुणाला दिले हे लोकांना माहिती आहे. बीड जिल्ह्यात सुपारी घेऊन टिका करणारी कोण हे सगळ्यांना माहिती आहे. घे भरारीच्या सभेतच मी यांच्यावर बोललो होतो. या बाई कित्येकदा बोलताना घसरल्यात, मात्र माध्यमे काही बोलत नाही. राष्ट्रवादीत, उबाठात भाषणं करताना जीभ घसरली तरी माध्यमे काही बोलत नाहीत. सुपारी घेऊन यांनी पॉस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला पद दिले, यांच्या थोबाडीत त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने मारली. आमच्या नेत्याने टीका केली, त्यामुळे या बाई कांगावाखोर असल्याचं दाखवून देतायेत असंही प्रकाश महाजनांनी म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरे राजकीय फायद्यासाठी आरोप करत नाहीत. राम मंदिर, कलम ३७० बाबत मोदींनी जे केले त्याचं खुल्या मनाने राज ठाकरेंनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींमुळे भारताची प्रतिष्ठा आणि मान वाढवली हे नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या भूमिका पटल्या नाहीत त्यावर राज ठाकरेंनी विरोध केला. ज्या पटल्या त्याचे कौतुकही केले असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले.