ठाणे - Jitendra Awahad on Raj Thackeray ( Marathi News ) राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट दिसतोय, ही आग लावण्याची कामे बंद करा, समाज इतका मूर्ख राहिलेला नाही. समाजालाही कळतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर आगपाखड केली आहे.
कळवा येथील सभेत राज ठाकरेंनी मुंब्रा येथे सापडलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी सांगितली. त्यासोबतच फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांवर निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, परप्रांतीय आणि मुस्लीम यांना टार्गेट करून तुम्हाला मराठी मते मिळतील असं होत नाही. महिलांना गॅसदरवाढीचा त्रास होतोय, महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल भरताना चारचाकी चालवणाऱ्या मराठी माणसाला किती त्रास होतो याबद्दल बोलावं, केवळ मारझोडीचं राजकारण ही महाराष्ट्राची अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय महायुतीचा प्रचार करताना राज यांनी कुठलाही नवीन मुद्दा पुढे आणला नाही. काही खास बोलले नाहीत. ज्या विषयावर ते कायम बोलत आलेत म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही. त्याच विषयावर बोलतात. मुस्लीमांना सरळ केले पाहिजे. परप्रांतीयांना सरळ केले पाहिजे. शिवसेनेच्या या दोन्ही जागा पडतील यासाठी राज यांना कुणी सुपारी दिलीय का असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान, हिंदू-मुसलमान, परप्रांतीयविरुद्ध मराठी अशी भांडणेच महाराष्ट्रात करत बसायची का? देशाची आर्थिक परिस्थिती कशी, बेरोजगारी, महागाई, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा निर्देशांक कुठे गेलाय, भूकेत आपण कुठे आहोत. श्रीमंतीत आपण कुठे आहोत, गरीब कोण झालेत, गरिबांच्या हाती भारतातील किती श्रीमंती आहे. शेती, उद्योग या विषयावर कधी बोलणार? फक्त मुसलमान आणि परप्रांतीय यावर किती दिवस बोलाल? मराठी मुलांना नोकऱ्या नाहीत त्यावर बोला. केंद्र सरकारने उद्योगधंदे गुजरातला नेले त्यावर बोलाल? इलेक्टोरल बॉन्डद्वारे जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल बोलाल? यासारखे विविध प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना विचारले.