मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचं राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समोर आलं आहे. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं वृत्त सर्व प्रमुख माध्यमांनी दिलं आहे. सोमवारी या दोघांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
सोनिया दुहन (Sonia Doohan) या शरद पवारांच्या पक्षातील युवती संघटनेचं राष्ट्रीय नेतृत्व करत होत्या. बराच काळ त्यांनी प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोनिया दुहन या २०१९ च्या राजकीय घडामोडीनंतर चर्चेत राहिल्या. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर काही राष्ट्रवादी आमदारांना खासगी विमानातून दिल्लीतील हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यावेळी सोनिया दुहन यांच्यावर शरद पवारांनी जबाबदारी सोपवली. त्यानंतर सोनिया दुहन यांनी या आमदारांना शिताफीनं हॉटेल बाहेर काढून मुंबईला आणलं होतं. तेव्हापासून सोनिया दुहन माध्यमात झळकल्या होत्या. शरद पवारांच्या विश्वासू म्हणून त्या ओळखल्या जातात.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले धीरज शर्मा (Dheeraj Sharma) यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. धीरज शर्मा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धीरज शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलंय परंतु सोनिया दुहन यांनी अद्याप कुठलाही दुजोरा दिला नाही. मात्र हे दोघेही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोललं जातं.
राष्ट्रवादीत फूट
जून २०२२ मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. अजित पवारांसोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही शरद पवारांची साथ सोडली. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनं महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे २ गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. सर्वात जास्त लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीत उभ्या होत्या. त्यामुळे बारामतीत कोण विजयी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.