कणकवली - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचे प्रश्न भाजपा विसरून गेली, आता काँग्रेस ज्यांना जास्त मुले त्यांना तुमची संपत्ती काढून देणार असं भाजपा बोलतेय. तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही त्यात आमचा दोष काय? म्हणून तुम्हाला आमची मुले कडेवर घ्यावी लागतायेत. पण हे करताना गावात कचरा उचलणारी गाडी येते तसं निवडणुकीत कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय, ज्यांना बाळासाहेबांनी गेट आऊट केले, ते इथले उमेदवार आहेत. तु कोणाला धमक्या देतोय, या धमक्यांना कोकणवासियांनी गाडून टाकलंय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर घणाघात केला.
कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, २००५ ची पोटनिवडणूक होती. संपूर्ण दहशतीचं सावट होते, मी स्वत: ८ ते १० दिवस इथं राहिलो होतो, गावपाड्यात जात होतो. तुमच्यातील काही लोक माझ्याकडे आले, इथे आम्हाला लढणारा माणूस द्या, आमची मुले-बाळे यांना इथे जायचं असते. त्याच्यानंतर वैभव, विनायक उभे राहिले. तुम्ही सगळे उभे राहिले. श्रीधर नाईकांपासून मालिका सुरू झाली, अंकुश राणे कुठे गेले, हत्या झाली, गायब झाले कुठे गेले काही भुताटकी आहे, राणेंना मत म्हणजे मोदींना मत, गुंडगिरीला मत आहे. जनतेच्या डोळ्यात त्यांनी केलेली पापे आजही कायम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तसेच उगाच वाट्टेल ते बडबडू नको, विनायक राऊतांची १० वर्षातील संसदेतील भाषणे आणि यांची भाषणे हे पाहा आणि मत द्या. ज्या घराणेशाहीविरोधात मोदी बोलतायेत, मी घराण्याचा वारस आहे. अभिमानाने सांगतो. अमित शाहांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी अभिमानाने सांगतो, मी माझ्या वडिलांचे नाव सांगतो, तसं तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव सांगा, माझ्या वडिलांच्या नावाने मत मागू नका. तुमच्या वडिलांच्या कर्तृत्व नाही का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना विधानसभेत सावरकरांवर बोललोय, तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवर बोला. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघाची स्थापना केली, त्यांनी ज्या मुस्लीम लीगनं भारताची फाळणी मागितली होती त्यांच्यासोबत बंगालमध्ये सरकारमध्ये बसले होते. तुमचे राजकीय बाप ते होते. त्यांच्याबद्दल बोला, काँग्रेसनं चले जावचा नारा दिला, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता. चले जाव चळवळ कशी वाईट हे मुखर्जींनी लिहिलं होते. त्यावर बोला. मात्र एवढे खोलात जाण्यापेक्षा तुम्ही १० वर्षात काय केले त्यावर बोला अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर केली.