Lok Sabha Election ( Marathi News ) : देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे.
ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल. कारण सध्याच्या स्थितीत ईव्हीएमची तांत्रिक क्षमता ४०० उमेदवारांपर्यंतची आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ईव्हीएमबाबत कशी आहे यंत्रणेची सज्जता?
राज्यामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM-VVPAT) चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2.47 लाख बॅलेट युनिट (Bus), एकूण 1.45 लाख कन्ट्रोल युनिट(CUs)आणि एकूण 1.53 लाख व्हीव्हीपॅट(VVPATs)यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि.29 डिसेंबर 2023 ते दि 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबवण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मार्चपासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 28 मार्चपासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07 मे रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12एप्रिलपासून सुरु होईल. चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार असूनयासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 18एप्रिलपासून सुरु होईल.पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिलपासून सुरु होईल. मतमोजणी दिनांक 04 जून रोजी होणार आहे.