मुंबई : राज्यातील ठिकठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडण्यासह, विजेच्या कमतरतेमुळे महावितरणला भारनियमन करावे लागले होते. भारनियमन काळात वीजग्राहकांना त्रास होऊ नये, याकरिता महावितरणने वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करत विविध मार्ग अवलंबविले होते. अखेर आता वीजस्थितीत सुधारणा झाली असून, राज्यातील भारनियमन कमी झाले आहे, शिवाय कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात आहे, असा दावा महावितरणने केला आहे.महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत आहे. परिणामी, ७ मे पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. २० मे पासून कृषिपंपांनासुद्धा पूर्ववत रात्री दहा तास किंवा दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात, गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या भागासह कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागले होते.वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती करत, कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे.महावितरणने करार केलेले सर्व वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.द्विपक्षीय कराराद्वारे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध करून, घाटघर विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्स्चेंजमधून ३०० ते १ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वीजखरेदी करत, विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.एप्रिल व मे या महिन्यात कमाल मागणी १९ हजार ते १९ हजार ६०० मेगावॅट नोंदविली गेली होती.
वीजस्थितीत सुधारणा लोकमत न्यूज नेटवर्क
By admin | Published: May 20, 2017 12:25 AM