नागपूर : आॅगस्ट क्रांतिदिनी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’चा नारा दिला होता. या नाऱ्यानंतर संपूर्ण भारतात इंग्रजांच्या विरोधात जनमत एकवटले होते. त्याच धर्तीवर विदर्भवाद्यांनी विदर्भाला महाराष्ट्रापासून मुक्त करण्यासाठी अनोख्या अशा ‘बस देखो रेल देखो’ या आंदोलनाचा नारा दिला आहे. या आंदोलनाला विदर्भातील विविध क्षेत्रातील अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने ही लोकचळवळ होण्याची शक्यता आहे. जनमंच या सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून हे अभिनव आंदोलन येत्या ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी पुकारण्यात आले आहे. त्याबाबत गुरुवारी लोकमत भवनात जनमंचच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याचर्चेत जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकात वानखडे, प्रा. शरद पाटील आणि प्रकाश इटनकर यांचा सहभाग होता. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही केवळ पुढाऱ्यांची मागणी असून लोकांची मागणी नाही, असे सातत्याने आरोप केले जात होते. परंतु आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर येथे स्वतंत्र विदर्भासाठी मतदान घेतले. या जनमतात ९६ ते ९७ टक्के लोकांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल दिला. केवळ एक टक्का लोकांचा विरोध होता. त्यामुळे विदर्भाची मागणी ही सामान्य लोकांचीच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. आजवर सर्वच राजकीय पक्षांनी विदर्भाच्या नावाचा केवळ वापर केल्यामुळे जनतेचा या मुद्यावर विश्वास राहिला नव्हता. तो विश्वास आम्ही कायम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. रेल देखो बस देखो या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचाच जास्तीतजास्त सहभाग वाढविण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून सत्ताधारी लोकांना जनतेची ताकद दाखवून त्यांच्यात भीती निर्माण करायची आहे. प्रा. शरद पाटील म्हणाले, स्वतंत्र विदर्भाला भाजपने जाहीर समर्थन दिले होते, परंतु आता त्यांचे बोलणे बदलले आहे. खासगीत बोलतात पण जाहीर बोलत नाही. येत्या विधानसभा निवडणूक ही विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विदर्भाबाबत खासगीत न बोलता विदर्भ कधी केव्हा व कसे देणार हे जाहीर करण्यास नेत्यांना भाग पाडण्यात येणार आहे. अॅड. अनिल किलोर म्हणाले की, या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन देशभरात व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येईल. बस स्थानकावर आंदोलन केल्याने तिथे येणाऱ्या गावपातळीवरील व्यक्तीला विदर्भाचा धागा बांधला जाईल. त्याच्या हाताला बांधलेल्या धाग्यासोबत विदर्भाचे आंदोलन त्याच्या गावापर्यंत पोहोचेल. रेल्वेस्थानकावर आंदोलन केल्याने देशभरात ते आंदोलन पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात भाजप पूर्ण बहुमतात आहे. तसेच विदर्भ राज्य करणे हा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारला आहे. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्या विरोधाची चिंता न करता स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्णय घेण्यास अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनतेने सहभागी व्हावे विदर्भाचे आंदोलन हे सामान्य जनतेने उभे केले आहे. त्यामुळे सामान्य जनतेसह विदर्भातील संघटना, ज्येष्ठ नागरिक व इतर संघटनांनी या आंदोलनाला बळ दिल्याशिवाय आंदोलन यशस्वी होऊ शकणार नाही. तेव्हा या शांततामय अहिंसक आंदोलनात सर्व वैदर्भीय जनतेने व संघटनांनी ९ आॅगस्ट रोजी नागपूरच्या मुख्य रेल्वेस्थानक व गणेशपेठ येथील बस स्थानकावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व आंदोलनाला यशस्वी करावे. अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष - जनमंच केवळ विदर्भ हाच मुद्दा असावा विदर्भाचा मुद्दा हा आणखी तीव्र करण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. तसेच निवडणुकीत अनेक मुद्दे असतात मात्र या निवडणुकीत विदर्भ हाच मुद्दा असावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देणे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचा प्रश्न न सोडविल्यास मतदानाद्वारे काय होऊ शकते, ही भीती निर्माण करणे हा उद्देश आहे. चंद्रकांत वानखडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा विदर्भ कनेक्ट ही संघटना खास विदर्भ आंदोलनाला गती देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे जनमंचने पुकारलेल्या रेल देखो बस देखो आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. इतकेच नव्हे तर आम्ही स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहोत. आमचे संपूर्ण सदस्य आंदोलनात सहभागी होतील. इतरांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. अॅड. मुकेश समर्थ, अध्यक्ष - विदर्भ कनेक्ट विदर्भ ही काळाची गरजविदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ ही काळाची गरज आहे. त्यामुळे जनमंचने पुकारलेल्या ९ आॅगस्टच्या आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळार्चे कार्यकर्ते खुल्या दिलाने सहभागी होणार आहेत. या आंदोलनात आमचा कार्यकर्ता सप्त खंजेरीवादक तुषार सूर्यवंशी हा खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन विदर्भ मिळविणे हाच उद्देश स्वतंत्र विदर्भासाठी वेगवेगळ्या बॅनरखाली आंदोलने होत असली तरी त्याचा मुख्य उद्देश हा विदर्भ राज्य मिळविणे आहे. त्यामुळे बॅनर कुठलेही असो विदर्भासाठी आमचे समर्थन आहेच. ९ आॅगस्टच्या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संपूर्ण पाठिंबा असून आम्ही स्वत: या आंदोलनात सहभाही होणार आहोत. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा व्हावी, ही मागणी लावून धरणार आहोत. नागरिकांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे. राम नेवले, निमंत्रक : विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी व तरुणांच्या भविष्याची लढाई स्वतंत्र विदर्भाची लढाई ही केवळ एका राज्याची मागणी नसून ती येथील शेतकरी व बेरोजगार तरुणांच्या भविष्याची लढाई आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय येथील शेतकरी व बेरोजगारांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे ९ आॅगस्टच्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा असून सामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे, अशी विनंती आहे. अहमद कादर, संयोजक - विदर्भ जॉर्इंट अॅक्शन कमिटी स्वतंत्र विदर्भासाठी शेवटपर्यंत लढू आमच्या संघटनेची स्थापना २०११ साली झाली. तेव्हा त्यात आम्ही विदर्भ हे नाव जाणीवपूर्वक सामील केले. कारण आमच्या संघटनेचा उद्देशच स्वतंत्र विदर्भ राज्य आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जनमंचने पुकारलेल्या ९ आॅगस्टच्या आंदोलनात आमचा संपूर्ण सहभाग राहणार आहे. विदर्भाच्या मागणीसाठी जेव्हा जेव्हा आंदोलने होतील, त्यात आमचा सहभाग राहील.ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. तेजिंदरसिंग रेणू, सचिव - विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशन आंदोलनाला पाठिंबास्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची मागणी राहिलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जी-जी आंदोलने होतात त्याला आमचा नेहमीच पाठिंबा असतो. जनमंचने पुकारलेल्या ९ आॅगस्ट रोजीच्या आंदोलनालाही विदर्भ मोलकरीण संघटनेचा पाठिंबा आहे. स्वतंत्र झालेली अनेक राज्य आज विकासाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास होण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज आहे. डॉ. रूपाताई कुलकर्णी, अध्यक्ष - विदर्भ मोलकरीण संघटना विदर्भासाठी आम्ही एकच स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेगवेगळ्या बॅनरखाली आंदोलने होत असली तरी आम्हा सर्वांचा उद्देश स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकच आहे. त्यामुळे जनमंचने पुकारलेल्या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दिवशी आंदोलनात सहभागी राहू. दीपक निलावार,मुख्य निमंत्रक : विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही स्वतंत्र विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत येथील औद्योगिक विकास होणार नाही. औद्योगिक विकास झाला नाही तर बेरोजगारांची समस्या सुटणार नाही. विदर्भातील तरुण मोठ्या संख्येने मुंबई, पुणेकडे जात आहेत. उद्योगाची निर्मिती विदर्भात झाल्यास तरुणांना संधी मिळेल. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज असून विदर्भासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा पाठिंबा राहिला आहे. ९ आॅगस्ट रोजीच्या आंदोलनालाही आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष - बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
लोकलढा विदर्भाचा !
By admin | Published: August 08, 2014 1:12 AM