मुंबई - दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना लोकमंगल खत प्रकरणाममुळे आगामी निवडणुकीत फटका बसण्याची चर्चा मतदारसंघ व भाजप पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर लोकमंगल खत प्रकरणाममुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी सुद्धा त्यांच्यासाठी अडचण ठरणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. निवडणुकीत या मुद्द्यावरून विरोधक प्रचार करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुका येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुद्धा पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र असे असले तरीही भाजप पक्षातील उमेदवारी देण्याचा निर्णय थेट अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे.
मात्र नुकतेच गाजलेले लोकमंगल खत पुरवठा प्रकरणामुळे भाजपवर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाले होते. तर विरोधकांनी यावरूनच सरकारवर जोरदार हल्ला केला होता. तर लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर मी नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुभाष देशमुख जरी थेट संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे नातेवाईक किंवा सहकारीच लोकमंगलच्या संचलाकपदी असल्याचे स्पष्ट झाले होते.
तर निवडणुकीत विरोधकांकडून याच मुद्यावरून सरकारवर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा पाहायला मिळत असल्याने, देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे.