पुणो : स्वराज्यासाठी रक्त सांडलंच पाहिजे, त्याशिवाय स्वराज्याची किंमत कळणार नाही. देशकार्य म्हणजेच देवकार्य. शिक्षणाचा फायदा जितका देशाला करून देऊ, तितकी देशाची प्रगती होणार आहे. हे तेव्हाच सत्यात उतरेल जेव्हा आपण सगळे एकत्रित येऊ. कारण लोकमत ही फार मोठी शक्ती आहे, असे मत टिळकांच्या भूमिकेतून अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
निमित्त होते, ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या चित्रपटाच्या पहिल्या सादरीकरणाचे. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. दीपक टिळक, नितीन केणी, मिलिंद मराठे, भारतकुमार राऊत, सुधीर गाडगीळ उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘टिळकांसारख्या महापुरुषाचे चरित्र या प्रभावी माध्यमातून लोकांसमोर येत आहे, याचा आनंद आहे. त्यांचे चरित्र हे असामान्य आहे, त्याला तोड नाही. त्यांचे वेगळेपण गीतेत शोधावे लागेल.’’
या वेळी शर्वरी जमेनीसने नृत्य सादर केले. ¬षीकेश बडवे यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. नंदेश उमप यांच्या पोवाडय़ाने कार्यक्रमात जोश आणला. अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
लोकमान्यांची भूमिका साकारणो हे एक मोठे आव्हान होते. ही भूमिका साकारताना त्यांचा पेहराव करायला मिळणो हा माझा खूप मोठा सन्मान समजतो. गणोशोत्सवाची सुरुवात ज्यांनी केली त्यांच्या मातीतच माझा जन्म झाला, म्हणूनच कदाचित म्हणत असतील ‘वाण नाही, तर गुण लागतोच ना.’
- सुबोध भावे,
अभिनेता