लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर लोकमत 'रक्ताचं नातं' या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सोमवारी त्याची घोषणा करण्यात आली. या रक्तदान महायज्ञाच्या लोगोचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनी, २ जुलैपासून राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
लोकमत 'रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत रक्तदान करण्यासाठी इच्छुकांना डिजिटल प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे.
कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली, तर विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करेल. आज ५० टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. 'लोकमत'च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. या अभियानामुळे प्रत्यक्ष रक्ताची गरज असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.