मुंबई : तारकांदळासह कॉर्पोरेट सेक्टरमधील दिग्गज, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्या मांदियाळीने भारावलेला ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार सोहळा नुकताच वरळी येथील फोर सिझन हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. कॉर्पोरेट सेक्टरला चारचाँद लावलेल्या सोहळ्यातल्या पुरस्कारांसह आयोजित परिसंवादाने उपस्थितांना बौद्धिक खुराक देतानाच सोहळ्याने दिग्गजांच्या भेटीगाठी घडविल्या आणि मनोरंजन क्षेत्रातल्या गमतीजमतीने सोहळ्यात आणखीणच झगमगाट आला. शून्यातून उगवलेले उद्योगाचे रोपटे, औद्योगिक विकासातील वाटा, स्टार्ट अपद्वारे उद्योगविश्वातील उडी; अशा मराठी मातीतील उद्यमशीलतेला पुरस्कारांनी सलाम केला.चौथे वर्ष असलेल्या सोहळ्यात राज्यभरातील ४७ उद्योजकांचा गौरव करण्यात आला. हिंदी सिने अभिनेता सोनू सूद, अभिनेता शशांक केतकर हे सोहळ्याचे आकर्षण ठरले. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर) कैसर खलिद, अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, फॅशन डिझायनर शायना एन.सी., ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर या मान्यवरांची या वेळी हजेरी होती.विजय दर्डा यांनी हा उद्योजकांच्या मेहनतीचा सन्मान असल्याचे मत मांडत ‘लोकमत’ हे केवळ एक वृत्तपत्र नाही, तर ही एक चळवळ आहे, असे नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे वाचक हाच ‘लोकमत’चा मालक आहे, असेही ते म्हणाले. सोनू सूद यांनी ‘लोकमत’च्या मंचावर आल्याचा आनंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या. अरविंद सावंत यांनी येथे पुरस्कृत होणारा प्रत्येक जण हा असाधारण आहे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, ‘ड्रायव्हिंग बिझनेस एक्सलन्स’ या विषयावर या वेळी रंगलेल्या चर्चासत्रात कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदविला होता. मोहन ग्रुपचे जितू मोहनदास हे या सोहळ्याचे सहप्रायोजक होते. रिजन्सी ग्रुपचे महेश अगरवाल हे या सोहळ्याचे साहाय्यक प्रायोजक होते.बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन हे या सोहळ्याचे नॉलेज पार्टनर होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. अर्चना यांनी केले.
- ड्रायव्हिंग बिझनेस एक्सलन्स
या चर्चासत्रात युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष केवल हंडा, एल अॅण्ड टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष योगी श्रीराम, जे.के. एंटरप्रायझेसचे सीईओ अनंत सिंघानिया, बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष एम.डी. अग्रवाल व एफसीबी इंटरफेसचे उपाध्यक्ष नितीन भागवत यांनी सहभाग घेतला. हरिभक्ती ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शैलेश हरिभक्ती हे चर्चेचे सूत्रधार होते.
- ‘आईच्या गावात’चे कौतुक
मराठी सिनेनाट्यसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर याचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. अभिनयापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता उद्योग क्षेत्रातही स्थिरावल्याने त्याच्या पुणेस्थित ‘आईच्या गावात’ या हॉटेलला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. खवय्यांना आईच्या हाताची चव मिळावी म्हणून मुद्दामहून हॉटेलला असे नाव दिल्याचे शशांक केतकर यांनी सांगितले.
- अच्छे दिन येवोत...
खासदार अरविंद सावंत यांनी ‘लोकमत’च्या दिल्लीतील आवृत्तीचे कौतुक केले. प्रादेशिक भाषांमधील वर्तमानपत्र असून दिल्लीत मिळविलेले स्थान वाखाणण्याजोगे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे, भविष्यात नवउद्योजकांना भरारी घेण्यासाठी ‘अच्छे दिन’ येवोत अशा शुभेच्छाही दिल्यात. दिल्लीतही मराठी वर्तमानपत्र वाचता येते याचा मला अभिमान आहे.
- बाबांच्या आठवणींना उजाळा
भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी सीएसआर उपक्रमाविषयी सांगताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, मनूस्मृतीमध्ये दानाची जी संकल्पना आहे त्यातून कायम शिकायला मिळाले. तसेच, बाबा नेहमी सांगायचे जी व्यक्ती आपल्या आयुष्यात दान करते तिला रात्री झोप येते. त्यामुळे कायम समाजासाठी काही तरी करण्याची सवय जडली आहे.
- सोनूची ‘कुंग फू’ स्टाइल
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी या सोहळ्यात नागपूरच्या आठवणी जागविल्या. ‘कुंग फू’ या मार्शल आर्टचे धडे गिरवणाऱ्या सोनूने या सोहळ्यातही खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव याचे प्रात्यक्षिक दाखविले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर थेट रंगमंचावर ‘वन हँड पुशअप’ करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कॉर्पोरेट क्षेत्रातील या पुरस्कार सोहळ्यामुळे दिग्गजांचा यथोचित गौरव झाला आहे, असेही सूद यांनी सांगितले.