पुणे : ‘लोकमत’शी असलेल्या ऋणानुबंधाविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘मला ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला निमंत्रणाची आवश्यकता पडत नाही. ‘लोकमत’ आपले घर वाटते. त्यामुळे वर्षातून अनेक कार्यक्रमांना जातो; पण पुण्यात मी पहिल्यांदा आलो. आपल्या नागपूरचा पेपर पुण्यातही पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतरच नागपूरकरांना बोलावू, असे कदाचित विजय दर्डा यांना वाटले असेल.’’‘लोकमत’ने महाराष्ट्रात देशात आपली प्रतिमा तयार केली आहे. दिल्लीत छापला जाणारा हा एकमेव मराठी पेपर आहे. देशात सर्वाधिक वार्ताहर ‘लोकमत’जवळ असून त्यांची संख्या पाच हजार आहे. याचे आश्चर्य वाटते. एवढे मोठे जाळे ‘लोकमत’ने तयार केले आहे. मला आठवते, की जवाहरलाल दर्डा आणि माझ्या वडिलांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेलो, त्या वेळी नागपूरच्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यांनी मला सांगितले, की ‘वडिलांचे नाव मोठे कर. त्यांच्यासारखेच काम कर. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत.’ त्या दिवसानंतर राजकारणात आज मला २५ वर्षांहून जास्त काळ झाला. या संपूर्ण वाटचालीत ‘लोकमत’ नेहमीच माझ्या पाठीशी राहिला. विजय दर्डा हे एखाद्या भावासारखे पाठीशी राहिले. राजकारणात आमचा पक्ष वेगळा आहे; पण माझ्या कामाची वाहवा करणारा त्यांच्यासारखा मोठा कोणीच नाही. कारण मी जिथे नसतो, तिथे माझ्याबद्दल ते अनेक गोष्टी सांगत असतात. अनेक लोक मला हे येऊन सांगतात. हा ऋणानुबंध अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.पुणेकर ‘लोकमत’वर भरभरून प्रेम करतात. ते कसलाही भेदभाव करीत नाहीत. आजचा दिवस ‘लोकमत’साठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला आले आहेत. यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, यूपीएच्या अध्यक्षा व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ‘लोकमत’च्या कार्यक्रमाला पुण्यात आल्या होत्या. ‘लोकमत’ पुण्यात क्रमांक एकचे दैनिक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. आज सांगायला आनंद वाटतो, की ‘आयआरएस’नेदेखील ‘लोकमत’ पुण्यात क्रमांक एकचे दैनिक असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी पुणेकरांना अर्पण करीत आहे. ‘लोकमत’ पुणेकरांच्या आशाआकांक्षांशी एकरूप झाल्याने हे शक्य झाल्याचे ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष, माजी खासदार विजय दर्डा यांनी या वेळी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास अत्यंत यशस्वीपणे केला आहे. त्याची दोन कारणे आहेत. ते विनम्र व अभ्यासू आहेत. ज्याप्रमाणे ‘लोकमत’ कोणत्याही पक्षाचे नाही, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कसलाही भेदभाव न करता राज्याचा विकास केला. आमच्या दोघांचे वेगळे पक्ष आहेत; परंतु आम्ही दोघे मनाने एक आहोत. कारण राज्याचा विकास व्हावा, ही मुख्यमंत्र्यांसह ‘लोकमत’चीही भावना आहे. ही विदर्भाची संस्कृती आहे. माझ्या वडिलांची शिकवण आहे, की निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची चांगली व्यक्ती असेल तर तिला समर्थन द्यायला हवे. चांगले लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाहीत, तोपर्यंत लोकशाही मजबूत होऊ शकत नाही. माझ्यावर अनेकदा आरोप होतो की, मी फडणवीस, गडकरी यांना मदत करतो. पण, मी मदत करत नाही, मी माझे कर्तव्य बजावतो. या समाजाचा घटक म्हणून ‘लोकमत’ची जबाबदारी आहे. लोकांनी ‘लोकमत’वर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री अनेक चांगली कामे करीत आहेत. त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. माझ्या मनातही कसलाही भेदभाव नाही. भाषावाद, प्रांतवाद नाही; पण विदर्भावर जो अन्याय झाला आहे, तो अन्याय दूर करण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करीत असतील तर विदर्भाला ते झुकते माप देत असल्याचा आरोप चुकीचा आहे.‘लोकमत’च्या मंचावरून गडकरी, फडणवीस यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी प्रत्येक भागाला समतोल न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष पक्षाच्या ठिकाणी असतो. त्यापेक्षाही सर्वसामान्य लोकांचा विकास करणे महत्त्वाचे आहे, असे दर्डा यांनी नमुद केले.‘लोकमत’मध्ये तीन गट; मुख्यमंत्र्यांनी उघड केले गुपित!‘लोकमत’मध्ये तीन गट कार्यरत असल्याचे गुपित मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीरपणे उघड केले. ते म्हणाले, ‘पहिला गट विदर्भाचा. या गटात मी आणि विजय दर्डा. दुसरा गट मराठवाड्याचा. या गटात मी व राजेंद्र दर्डा. तिसरा गट आहे महाराष्ट्राचा. या गटात आम्ही तिघेही एकत्र आहोत. विदर्भाचा मुद्दा आला की आम्ही दोघे एका बाजूला असतो आणि राजेंद्र दर्डा मराठवाड्याची भूमिका मांडत असतात. मराठवाड्याचा मुद्दा आला की राजेंद्र दर्डा आणि मी एकत्र असतो. पण जेव्हा महाराष्ट्राचा विचार येतो तेव्हा आम्ही तिघेही एकत्रिपणे महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, याकरिता प्रयत्न करीत असतो,’ हे गुपित मुख्यमंत्र्यांनी उघड केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.क्रीडा खाते तुमच्याकडे घ्या : विजय दर्डाखेळाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करायला हवे. तसेच, हे खाते इतर कोणाकडे न देता मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवायला हवे, अशी विनंती विजय दर्डां यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली. अशीच विनंती राज्यसभेत पंतप्रधानांनाही केल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, आर्थिक सुबत्ता, संस्कृती व खेळांची प्रगती यांसह विविध बाबतींत देशाचा विकास पाहिला जातो. नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्येही क्रोएशियाच्या पंतप्रधान, फ्रान्सचे राष्ट्रपती कशा पद्धतीने वागतात, हे आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याकडे आमदारांनाही कोणी भेटू शकत नाहीत. इतरांची गोष्ट तर वेगळी आहे. पण, मुख्यमंत्री लोकांमध्ये मिसळतात. त्या वेळी ते मुख्यमंत्र्यांसारखे वागत नाहीत; पण काम करताना मात्र ते मुख्यमंत्र्यांसारखे वागतात. त्यांचा जीवनातील प्रवास अत्यंत साधेपणाने असतो, असेही विजय दर्डा यांनी सांगितले.
‘लोकमत’ने देशात प्रतिमा तयार केली : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:37 PM