ऑनलाइन लोकमतधुळे, दि. ४ : एस.टी. महामंडळाने धुळे शहर व लगतच्या परिसरात मिनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस सेवेला ११ जुलैपासून प्रारंभ होईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. महामंडळाच्या बऱ्याच बसेस थांबत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याच समस्येतून गत २४ जून रोजी भीरढाणे फाट्याजवळ कालीपिली वाहनास झालेल्या भीषण अपघातात १८ जण मृत्युमुखी पडले होते.या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या एस. टी. महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवाशांसाठी तातडीने बैठक घेऊन शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.११ जुलैपासून मीनी बसेस शहरातील चार प्रमुख टप्प्यांवर धावणार आहेत. त्यात लळिंग ते नगाव, फागणे ते मोराणे, वडजई ते वलवाडी व धुळे बसस्थानक ते चककरबर्डी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अशा प्रमुख मार्गांचा समावेश आहे. प्रत्येक टप्प्यावर बसेसच्या दिवसभरात ८० ते ८४ फे ऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. या बसेसचे भाडे कमीत कमी ६ ते जास्तीत जास्त २५ रुपयांपर्यंत राहणार असून ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे आहे.या मीनीबसमध्ये ३० प्रवासी एका वेळी बसून प्रवास करू शकतात, असे एस. टी. महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. लोकमत इफेक्ट२४ जून रोजीच्या भीषण अपघातानंतर ‘लोकमत’ने धोकादायकरित्या खासगी प्रवासी वाहतुकीचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. यासंदर्भात धुळे शहरालगतच्या गावांवर एस.टी.बसेस थांबत नसल्याने नाईलाजाने लोक कसा जीव धोक्यात घालून प्रवास करतात यासंदर्भातील वस्तुनिष्ठ सर्वेक्षणही ‘लोकमत’ने शनिवार, २ जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर एस.टी.महामंडळाने हा मिनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरवासियांच्या मागणीनुसार आता ११ जुलैपासून मीनी बस सेवा शहरात सुरू होत आहे. दिवसातून चार फेऱ्या या तालुक्यातील प्रत्येक गावात होत जाणार आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास न करता प्रवाशांनी मीनी बस सेवेचा लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करावा. या बसचे भाडे अल्प राहणार आहे. - राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, धुळे बस आगार
लोकमत इफेक्ट - धुळे तालुक्यात ११ जुलैपासून मिनी बससेवा
By admin | Published: July 04, 2016 8:31 PM