लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने, ऊर्जा क्षेत्राचा आर्थिक विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा या प्रमुख विषयांवर मंथन होणार आहे. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासातील ऊर्जा क्षेत्राचा वाटा आणि भविष्यातील दीर्घकालीन योजना अशा महत्त्वपूर्ण बाबींवरही प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. शनिवार, १० जून रोजी मुंबईत या शानदार कार्यक्रमाचा शुभारंभ होईल.‘लोकमत ऊर्जा समिट’ची सुरुवात ‘लोकमत’ मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या स्वागतपर भाषणाने होईल. ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आपल्या भाषणातून कार्यक्रमाची संकल्पना आणि रूपरेषा मांडतील. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या महत्त्वपूर्ण भाषणातून ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व उलगडले जाणार आहे.पहिल्या सत्रात सकाळी ११.२० वाजता ‘ऊर्जा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र पार पडेल. या चर्चासत्रात केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे माजी सचिव अनिल राझदान, एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक दीपक कोकाटे, स्टरलाईट पॉवरचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी वेदमणी तिवारी आदी मान्यवर सहभागी होतील.दुसऱ्या सत्रात दुपारी १२.०० वाजता ‘रिन्युएबल एनर्जी : ट्रान्सफॉर्मिंग द इंडियन इलेक्ट्रिसिटी लॅण्डस्केप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन, ‘फर्स्ट सोलार’चे देशातील प्रमुख सुजॉय घोष, ‘रवीन ग्रुप आॅफ कंपनी’चे अध्यक्ष विजय करिया आदी मान्यवर मते मांडतील.तिसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता ‘फायनान्शियल हेल्थ आॅफ स्टेट डिस्कॉम्स-महाराष्ट्र प्रॉस्पेक्टिव्ह’ या विषयावर टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना, रिलायन्स एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष बॅनर्जी, महावितरणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक या मान्यवरांचा सहभाग असेल. यासह ‘लोकमत ऊर्जा समिट’मध्ये देशासह राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी वीज कंपन्यांचे प्रतिनिधी आणि खासगी वीज कंपन्यांच्या प्रतिनिधीसह कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
मुंबईत शनिवारी रंगणार ‘लोकमत’ ऊर्जा समिट २०१७
By admin | Published: June 09, 2017 5:11 AM