मुंबई - राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. महत्वाच्या धरणांमधे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढत आहे, त्यामुळे ३७ पैकी 24 धरणांमधून पाणी सोडणे सुरु झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणातून पाणी सोडणे सुरु झाले असून खडकवासला आणि वारणेतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून ३६४० व पावरहाऊस मधून ७५० असे एकूण ४३९० क्यूसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. त्याशिवाय वाडीवलेमधून १३७, भाटघरमधून २१६७ आणि मुळशीमधून ७००० क्यूसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.
बुधवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या काही बैठका लावण्यात आल्या होत्या मात्र राज्यभर मोठ्या पावसाचा इशारा असल्यामुळे सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्याचे व अधिका-यांना धरण परिसरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एरव्ही आमच्या धरणातून पाणी सोडू दिले जाणार नाही अशी ताठर भूमिका घेणारे राजकारणी आणि त्या भागातील लोक आपापल्या पट्ट्यातील भरलेली धरणं पाहून खूष आहेत आणि पाणी सोडले जात असल्याचे पाहून गावागावात चर्चेला उधाण आले आहे. मात्र मराठवाडा आणि नागपूर विभागातील एकाही धरणातून पाणी सोडण्यासारखी आज स्थीती नाही असेही मंत्री महाजन म्हणाले.
तर जायकवाडी आणि कोयनेचे दरवाजे उघडणार
गेल्या अनेक वर्षापासून पाण्यामुळे तहानलेल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येणे सुरु झाले आहे. जायकवाडीच्या वरती असणा-या सगळ्या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यामुळे २१७१ दलघमी क्षमता असलेल्या या धरणात आजमितीला १९२५.३० दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. हा साठा २१७१ च्या वरती गेला तर जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागतील. तर कोयनेची क्षमता २८२६ दलघमी ची आहे तेथे आज या क्षणी २८०४.८६ दलघमी पाणी साठा आहे. ज्याक्षणी ही पातळी ओलांडली जाईल त्यावेळी कोयनेचेही दरवाजे उघडण्याची वेळ येईल असेही गिरीष महाजन म्हणाले.
कोठून किती पाणी सोडणे सुरु झाले आहे?
(धरणाचे नाव, जिल्हा, प्रती क्यूबिक मीटर पर सेकंद - या क्रमाने)
कोकण विभाग
सूर्या धामणी ठाणे १५८
भातसा ठाणे १३५.७५
नाशिक विभाग
वैतरणा नाशिक ४१.३३
दारणा नाशिक १२२.२९
गंगापूर नाशिक ६२.६३
भंडारदरा अहमदनगर ९०.९५
हतनूर जळगाव २७६
पुणे विभाग
पानशेत पुणे ४५.३१
वरसगाव पुणे ११७
खडकवासला पुणे ६८४.८१
पवना पुणे ४०.३५
चासकमान पुणे १२८.४२
घोड पुणे ४९.८४
नीरा देवधर पुणे २०३.५४
भाटघर पुणे ६१.३६
वीर सातारा ४४२.१४
कृष्णा धोम सातारा ७.०८
कृष्णा कण्हेर सातारा १४४.६४
धोम बलकवडी सातारा ६४.००
भीमा उजनी सोलापूर ६७१.१०
वारणा सांगली ६६६.८०
दूधगंगा कोल्हापूर १७६
राधानगरी कोल्हापूर १८३.६०