डिप्पी वांकाणी
मुंबई, दि. २५ - चार महिन्यांपूर्वी मुंबईच्या मालवणी भागातून चार मुस्लिम तरूण बेपत्ता झाले. इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी घर सोडल्याची भीती त्यांच्यापैकी एक असलेल्या वाजिद शेखची पत्नी फातिमा हिने वर्तवली आणि राज्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा ख़डबडून कामाला लागली. वाजिद शेख (२५) नूर मोहम्मद (३२), अयाज सुलतान आणि मोहसीन चौधरी (३०) या चौघांनीही इसिसमध्ये सामील होण्याच्या इराद्याने १५ डिसेंबरच्या सुमारास घर सोडले खरे मात्र मीडियात, चॅनेलवर आपले मिसींगचे फोटो झळकल्यानंतर मोहसीनने पळ काढला. अयाज सुलतान हा आधीच देश सोडून गेला असून काबूल येथे इसिसमध्ये सामील झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र वाजिद शेख आणि नूर मोहम्मद मुंबईला परतले. महाराष्ट्र एटीएस आणि धर्मगुरूंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील कट्टरपथींयाचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न केला.
'इसिस'ची विचारधारा फक्त चुकीची नसून कुराणातील वाक्यांचा चुकीचा अर्थ लावून तरूणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही त्यांनी सांगितले. हे दोघे परत आल्यानंतर सर्वात प्रथम 'लोकमत'ने त्यांच्याशी खास संवाद साधून त्यांच्या या कृत्यामागचा उद्देश, त्यांची हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वाजिद शेख : अवघ्या २५ वर्षांचा असलेला वाजिद हा कॉमर्स ग्रॅज्युएट असून तो लिबांचा व्यापारी आहे. मालवणी येथे तो त्याचे आई-वडील व पत्नीसह राहतो. मुंबईत परत आल्यानंतर तो व त्याचे कुटुंबिय एक वेगळ्या पण चांगल्या चाळीत रहायला लागले आहेत. 'नमाज अदा करण्यासाठी आम्ही मशिदीत भेटायचो तेव्हा मोहसीन आणि अयाज आम्हाला सीरियावर असदाने केलेला हल्ला, तसेच जगभरता मुस्लिमांवर होणारे अत्याचार याबद्दलचे वेगवेगळे व्हिडीओ दाखवायचे. तसेच विविध परदेशी नागरिकांचे शीर कलम करणा-या जिहादी जॉनचे व्हिडीओही आम्हाला दाखवण्यात येत असत. मशिदीमधील मौलाना तर इसिसविरोधात बोलायचे, आम्हाला मात्र युकेतील अबू बाराचे प्रवचन, विचार ऐकण्यास सांगितले जात असे' असे वाजिद म्हणाला.
' घर सोडून जाण्यापूर्वी वाजिदने एकदाही (पुढे काय होईल) विचार केला नाही. वाजिद बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तर त्याचा कसून शोध घेतला जाणार नाही असे मला माझ्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मी पोलिसांत तक्रार नोंदवतानाच तो इसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून गेल्याची शंका वर्तवली' असे वाजिदची पत्नी फातिमाने नमूद केले. ' आम्ही आमच्या घरच्यांना सोडून पळून गेलो ' असा संशय पोलिसांना येईल असे आम्हाला वाटल्याचे वाजिदने स्पष्ट केले.
'जगभरातील मुस्लिम युद्धात सहभागी होत आहेत असं आम्हाला वाटलं. आणि आम्हाला दाखवण्यात आलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर आपणही त्यांना (युद्धात) सामील व्हावं असं वाटल्यानेच आम्ही घर सोडलं, पण ती आमची चूक होती.' असे त्याने सांगितलं. ' घर सोडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बसने कर्नाटकच्या हरिहर गावात गेलो, मोहसीनने ती तिकीटं ऑनलाईन बूक केली होती. तिथे आम्ही नूरच्या नातेवाईकांच्या घरी राहिलो, त्यानंतर आम्ही बसने हैदराबाद आणि नंतर ट्रेनने चेन्नईला गेलो. तिथे आम्ही स्टेशनजवळच्याच एका लॉजमध्ये राहिलो, तिथे टीव्ही पाहताना आम्हाला आमचे (मिसींग) फोटो दिसले आणि आम्ही घाबरलो. पण आम्हाला काही कळायच्या आतच मोहसीन आम्हाला सोडून गेला , त्यानंतर मी आणि नूरने मुंबईत परत येण्याचा निर्णय घेतला पण तेही वेगवेगळं... मी पुण्यात असतानाच पोलिसांनी मला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि एटीएस अधिका-यांनी सुमारे २० दिवस माझी कसून चौकशी केली. मात्र त्यांनी मला त्रास न देता अतिशय चांगली वागणूक दिली आणि माझ्या इसिसबद्दलच्या गैरसमजुती दूर केल्या.' असे वाजिदने सांगितले. ' इसिसमुळे प्रभावित होऊन मी चुकीच्या मार्गावर भरकटलो होतो, पण आता मला योग्य रस्ता मिळाला आहे. मी आता सर्व तरूणांना सांगू इच्छितो की इसिसची विचारधारा दिशाभूल करणारी आहे' असेही त्याने नमूद केले.
नूर मोहम्मद : ' जर तुम्ही एखाद्या माणसाची हत्या केली तर तुम्ही संपूर्ण माणुसकीची हत्या करता आणि एखाद्याचा जीव वाचवला तर सर्व माणुसकीला जीवदान देता... गुलबर्गातील एक मशिदीत कुराणमधील हे वाक्य मी वाचलं आणि मुंबईला परत येण्याचा निर्णय घेतला. वाजिदप्रमाणेच नूरही आता कुटुंबियांसह दुस-या ठिकाणी रहायला गेला असून त्यासाठी तो एटीएस अधिका-यांचा आभारी आहे. ' त्यांनी मला केवळ हे घर मिळवून देण्यातच मदत केली नाही तर मी हॉस्पिटलमध्ये असताना घराचे भाडेही भरलं एवढंच नव्हे तर मला काम मिळावं यासाठी स्थानिकांकडे शब्दही टाकला, त्यांच्यामुळेच मी आज कमवून माझ्या कुटुंबियांचे पोट भरू शकतो' असे नूरने नमूद केले.
तू इसिसच्या मार्गाकडे कसा वळलास असे विचारला असता तो म्हणाला, ' मोहसीन एक उत्तम वक्ता आहे, त्यामुळे कोणीही त्याच्या बोलण्याने, भाषणाने प्रभावित होतो. खर सांगू तर मला आत्ताही माहीत नाही की मी त्याच्यासोबत जाण्यास कसा तयार झालो. तो आम्हाला ब-याच गोष्टी ऐकवायचा आणि असे व्हिडीओ दाखवयाचा, ज्यामुळे कोणालाही इसिसयची भूमिका पटली असती. मोहसीनच्या गोड बोलण्याला मी बळी पडलो आणि माझ्या कुटुंबियांसोबत अन्याय केला.
मी आता (नमाजासाठी) मशिदीत जाणं बंद केलं आणि घरीच प्रार्थना करतो. परत आल्यानंतर मी वाजिदलाही भेटलो नाहीये. मी गेल्यानंतर माझी पत्नी आणि मुलांचं काय होईल याचा जराही विचार न करता मी बाहेर पडलो, हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. एटीएस अधिका-यांनी माझी खूप मदत केली आणि मी त्यांचा खूप ऋणी आहे. हा देश माझा आहे आणि माझ्या देशाला अभिमान वाटेल असंच काहीतरी मी केलं पाहिजे, असेही त्यांनी मला सांगितलं.
(घरी) परत आल्यापासून मी अनेक धार्मिक पुस्तकं, ग्रंथ वाचतो आहे. इसिसने स्वत:च्या विचारधारांप्रमाणे धर्मग्रंथातील वचनांचा कसा सोयीस्कर अर्थ लावला आणि ते कसं योग्य नव्हतं, त्याची मला आता जाणीव होत आहे, असे नूरने नमूद केले.