मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या मनमानी खरेदीचा भांडाफोड लोकमतने केल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय गाजवला. या खरेदी प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली, तर ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून खरेदी झाल्याचा आरोप विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.आपल्या नावात दिपक आहे, पण आपल्या खात्यात मात्र पूर्ण अंधार आहे, अशी बोचरी टीका करत मुंडे म्हणाले, सभागृहात चर्चा सुरु होण्याआधीच आरोग्य मंत्र्यांनी दोन उपसंचालक निलंबित करण्याची घोषणा केली. कोणतीही चौकशी न करता आपण हे निलंबन तडकाफडकी केले, याचाच अर्थ आपल्याला छापून आलेला सगळा घोटाळा मान्य आहे असा होतो. आपण दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली, पण आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांची काहीच जबाबदारी नाही का, असे विचारत कोण आहेत हे पवार, तुमचे जावाई की शासनाचे, असा सवाल मुंडे यांनी केला. या सगळ्या प्रकाराची एसीबी मार्फत चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेत विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर टीका केली. गोरगरिबांना उपचार द्यायचे सोडून त्यांच्या उपचारासाठीचे पैसे हडप करण्यासारखे पाप नाही, असे सांगून विखे पाटील यांनी या खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे सभागृहात मांडले. तर जयंत पाटील यांनी ही खरेदीच कागदोपत्री झाल्याचा गंभीर आरोप केला. मीरा भार्इंदर, अकोला, भिवंडी सारख्या शहरांना पुरवठा करायचा आणि पैसे लाटायचे हे एक मोठे रॅकेट आहे , असे सांगून पाटील यांनी दुय्यम दर्जाची औषधे माथी मारण्याच्या प्रकरणावरुन सरकारवर कठोर टीका केली. (विशेष प्रतिनिधी)
‘लोकमत’ विधिमंडळात गाजला!
By admin | Published: April 13, 2016 2:00 AM