ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - लोकमतने नेहमीच स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून त्या मांडल्या जातात. हे चर्चासत्र लोकमतच्या विकास मिशनचा एक भाग आहे असे कौतुकाद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ चर्चासत्राबद्दल बोलताना काढले आहेत. देशासाठी आणि राज्यासाठी भविष्यातील वेळ महत्वाची आहे. रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे चर्चासत्र नवा दृष्टीकोन देण्यास मदत करेल. तज्ञ आपला दृष्टीकोन समोर ठेवण्यात येणार आहेत जे महाराष्ट्रासाठी फायद्याचं ठरेल असं नितिन गडकरी बोलले आहेत.
राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा वेध घेण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’चं आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आलं आहे.
‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधा या विषयांवर सविस्तर आणि उद्बोधक चर्चा होत आहे. त्यातून राज्याच्या व देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. देशभरातील रस्ते-महामार्ग, बंदरे आणि जहाज वाहतूक आणि व्हिजन महाराष्ट्र अशा तीन विषयांवर मंथन होणार असून दिवसभर ही चर्चा चालणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
रस्ते विकासाच्या चर्चासत्रात ‘येस बँक’चे संजय पालवे, ‘एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेड’चे वाय.एम. देवस्थळी, ‘एनएचएआय’चे राघव चंद्रा, ‘एमईपी इन्फ्रा’चे जयंत म्हैसकर, ‘टॉप वर्थ’चे अभय लोढा यांचा समावेश असेल.
बंदर विकासाच्या चर्चासत्रात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, ‘इनलॅण्ड वॉटरवेज’चे परवीर पांडे, ‘जेएनपीटी’चे नीरज बन्सल यांचा सहभाग असेल. राज्यातील पायाभूत सुविधा आणि व्हिजन महाराष्ट्र या चर्चासत्रात ‘एमआयडीसी’चे संजय सेठी, ‘सिडको’चे भूषण गगराणी, ‘एमएमआरडीए’चे यू. पी. एस. मदान, ‘एमएसआरडीसी’चे आर. एल. मोपलवार, ‘मुंबई मेट्रो-३’च्या अश्विनी भिडे, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी मिलिंद म्हैसकर या तज्ज्ञांचा समावेश असेल. तिन्ही सत्रांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही होईल. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.