महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'इनोव्हेटर इन अॅग्रीकल्चर' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल.
आण्णासाहेब जगताप- सावरगाव, जि. बीड
बाजारात पीक नेले की रोख पैसे मिळण्याच्या दिवसांत सेंद्रिय शेती कशी फायद्याची ठरणार; पण याचा विचार न करता, आपलाही एक दिवस असेल, ही जिद्द बाळगत बारावी पास अण्णासाहेब जगताप यांनी सेंद्रिय शेतीचे धाडस केले. सुरुवातीला लोकांनी टिंगल केली. मात्र, तेच लोक पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागले. आठ वर्षांपूर्वी त्यांनी एका एकरात २० क्विंटल गव्हाच्या उत्पादनातून दीड लाखाचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आता ते आंबा, रानभाजी व इतर भाज्यांची रोपं तयार करतात. गावरान बियाणे बँक, गावरान औषधालय सुरू करून बुरशीनाशक, कीटकनाशकांसह पिकाच्या वाढीसाठीची अनेक औषधी त्यांनी तयार केली. काळा गाजर व काळा हरभरा याबद्दल लोक अनभिज्ञ असताना दुर्धर आजारांवर औषध म्हणून हे उपयोगी असल्याचे त्यांनी दाखवून दिले. सेंद्रिय शेतीमध्ये अण्णासाहेबांनी काळा गाजर, काळा हरभरा लावून उत्पन्न मिळविले. कोरोनामुळे विक्रीला अडथळे आल्याने लिंक तुटल्याचे ते सांगतात. सध्या अण्णासाहेब आठ एकरात मूग, उडीद, तूर, भगरीचे उत्पादन घेत आहेत. गोल सेंद्रिय गहू, ज्वारीची लागवड करीत आहेत. त्यांच्या गहू, ज्वारी, डाळींना उत्तम भाव मिळतोय. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या डाळीबाबत लोकांचा विश्वास नव्हता. त्यावेळी ‘चव पाहा, पटलं तर घ्या’ म्हणत, डाळीचे मोफत सॅम्पल देत त्यांनी ग्राहक तयार केले. तडजोड न करता सेंद्रिय शेतीतून उत्पादन घेत लोकांमध्येही विश्वासही निर्माण केला.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
कमलेश पाटील- बाहुटे, पारोळा, जि. जळगाव
इयत्ता आठवीत असताना वडिलांचे अचानक निधन झाले. घरातील सदस्यांसह शेतीचीही जबाबदारी कमलेश यांच्या खांद्यावर आली. त्या प्रसंगाने डगमगून न जाता, त्यांनी शिक्षणासह शेतीही कसायला सुरुवात केली. अल्पावधीतच या तरुण शेतकऱ्याने कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीत केले. त्यांच्या शेतीत पिकणारी फळे, भाजीपाला सातासमुद्रापार पोहोचला. आज ४० एकर शेतीचे मालक असलेल्या कमलेश पाटील यांनी सात वर्षांपासून कपाशीसारख्या पारंपरिक व नगदी पिकाकडे पाठ फिरविली व फळे, भाजीपाल्याच्या माध्यमातून एकरी तब्बल चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेणे सुरू केले. कमलेश यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शेतीचा व्याप वाढल्याने शिक्षण थांबविले. दरम्यान, त्यांनी गावानजीकच्या तीन एकर शेतीत भाजीपाला लागवड सुरू केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतात बोअरवेल केली. त्यानंतर तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ३७ एकर शेतापर्यंत पाइपलाइन केली व संपूर्ण ४० एकर शेती बागायती केली. २०१५ पासून त्यांनी कापसाची लागवडच बंद केली. त्याऐवजी टरबूज, खरबूज या फळांची लागवड केली. त्यातून भरभराट होऊ लागल्याने त्यांनी त्याला जोड म्हणून कारले, मिरची, वांगी, भरताची वांगी, झेंडूची फुले अशा पिकांची लागवड केली. त्यांच्या शेतातील उत्पादने संयुक्त अरब अमिरातीसह अन्य अरब देशांमध्ये पोहोचू लागली. त्यातून सध्याच्या घडीला एकरी चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यांनी पाच एकरमध्ये रोपवाटिका तयार केली असून, गावातील इतर शेतकरी त्यांच्याकडून रोपांची खरेदी करतात.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
मनोज हाडवळे- मुं. पो. राजुरी, जुन्नर, पुणे
कृषी पर्यटन केंद्र संचालक, प्रशिक्षक तथा सल्लागार म्हणून ओळख असलेले शेतकरी कुटुंबातील तरुण कृषी स्टार्टअप उद्योजक मनोज हाडवळे यांनी कृषी विषयात एम. एस्सी. केल्यानंतर २००८ ते १० भारतीय स्टेट बँकेत वित्तीय कृषी अधिकारी म्हणून वर्धा येथे काम केले. नाबार्डच्या माध्यमातून वर्धा येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचे व जीवनपद्धतीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पेलली. त्यानंतर स्वत:च्या गावात, भागात शेतीसंदर्भात काही काम सुरू करावे, यादृष्टीने स्वत:च्या शेतीतच पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राची स्थापना केली. शेतीची व गावाची गोष्ट / व्यवसाय / संस्कृती / अर्थव्यवस्था / जीवनपद्धती / ध्यानधारणा / सर्जनशीलता समाजातील विविध घटकांना पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवायला देण्याचे काम मनोज करतात. मागील ११ वर्षांत २१ देशातील नागरिकांनी त्यांच्या निमित्ताने महाराष्ट्राची कृषी व ग्रामीण संस्कृती अनुभवायला आली. शालेय सहली प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रीय बीज निगम संस्थेने त्यांच्या लँड बँकमध्ये कृषी पर्यटन विकासाच्या संधी शोधण्यासाठी हरियाणा, राजस्थान राज्याच्या अभ्यासासाठी निमंत्रित केले होते. २०१५ ते २०२० या काळात त्यांनी पर्यटन प्रशिक्षक तथा सल्लागार म्हणून सेवा दिली. महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामीण पर्यटन धोरणाच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. राज्य पर्यटन प्रशिक्षक म्हणून त्यांनी पर्यटन संचालनालयात १ वर्ष काम केले. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण अभ्यासक्रम निश्चिती समितीचे ते सदस्य आहेत.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
मिथिलेश देसाई- झापडे, लांजा, रत्नागिरी
कोकण म्हणजे विस्तीर्ण समुद्र किनारा आणि आंबा, कांजू, नारळी-पोफळीच्याबागा. कोकणातला माणूस बाहेरून फणसासारखा ओबडधोबड वाटत असला तरी आतून गरासारखा गोड असतो, असे म्हटले जाते. मात्र, फणसाची व्यावसायिक शेती कोकणात होत नाही. घराजवळ झाडे असतात, तेवढीच. फणसाला शेतीचं रूप देण्याचं आणि त्याच्या विक्रीतून आर्थिक समृद्धी आणण्याचं काम राहुरी कृषी विद्यापीठातून बी. टेक. (ॲग्रिकल्चर) झालेले इंजिनिअर मिथिलेश हरिश्चंद्र देसाई करीत आहेत. देसाई कुटुंब व्यावसायिक तत्त्वावर महाराष्ट्रात फणस लागवड करणारे पाहिले शेतकरी कुटुंब आहे. मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांना महाराष्ट्राचे फणस किंग म्हणून ओळखले जाते. मिथिलेश यांनी जगातल्या १३० फणसाच्या व्हरायटींपैकी ८६ व्हरायटींची लागवड केली आहे. थेट अख्खा फणस न विकता त्याचा गर करून विक्री. एका फणसाचे १५०० ते २००० रुपये मूल्य मिळते. महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य फणस रोपवाटिका त्यांनी विकसित केली असून महाराष्ट्र, तसेच देशभर फणसाच्या जाती व झाडे येथून पाठविली जातात. ते मॉरिशसमध्ये फणसाची रोपे पाठवत आहेत. जकफ्रूट ऑफ गोवा यासाठी त्यांचे गोवा सरकारसह याच पद्धतीचे काम त्रिपुरा आणि मेघालय सरकारसोबत सुरू आहे. कोकणातील सर्वांत मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी (एफपीसी) आहे. एपीसीची फणसावर प्रक्रिया करण्यासाठी ५ कोटींच्या स्मार्ट प्रकल्पासाठी निवड झाली आहे. १० महिन्यांपूर्वी फणसाची १ टन हिरवी पाने त्यांनी जर्मनीला निर्यात केली. पानांचा कर्करोग उपचारासाठी होऊ शकतो का, याची तेथील संशोधन प्रकल्पात चाचपणी सुरू आहे. मधुमेहाच्या (टाइप टू) उपचारासाठीही फणसाचा उपयोग होतो. कच्चे फणस निर्यातीला त्यासाठी मोठा वाव असल्याचे मिथिलेश मानतात. २०१२ मध्ये देसाई कुटुंबाने २५० फणसाची झाडे लावली. मिथिलेश यांच्या प्रयत्नाने आता १८ एकर क्षेत्रावर १५०० झाडे आहेत. राज्यात मोठ्या क्षेत्रावर फणसाची लागवड करण्यात आली आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा
सुरेश गरमडे- रा. वायगाव (भोयर), वरारा, जि. चंद्रपूर
बिनभरोशाच्या पावसा-पाण्यावर शेती कसायची म्हणजे मोठी रिस्क. त्यात दुष्काळ बळीराजाच्या पाचवीला पूजलेला. तरीही कृषिप्रधान देशाची मान ताठ ठेवण्यासाठी काळ्या भुईची सेवा करत उल्लेखनीय प्रयोगातून सोयाबीन वाणांचे पेटंट मिळविणारे सुरेश बापूराव गरमडे हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोर तालुक्यातील वायगावचे सुरेश गरमडे यांना १२ वर्षांपूर्वी त्यांच्या सोयाबीनच्या शेतात वेगळ्या गुणधर्माच्या ३३५ वाणाच्या सोयाबीनच्या दोन जाती आढळल्या. त्यांना उत्सुकता, कुतूहल, संशोधन गप्प बसू देईना. त्यांनी आठ वर्षे त्या बियाणांची वाढ केली. त्याचे जतन, संवर्धन केले. हे वाण प्रतिकूल हवामानातही यलो मोझॅक रोगाला बळी पडत नाही हे त्यांच्या लक्षात आले. या वाणामुळे एक एकर शेतात १७ क्विंटल एवढे उत्पन्न निघते हेही त्यांनी पाहिले. एसबीजी - ९९७ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटिमीटरपर्यंत वाढते. या झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. त्यातही तीन ते चार दाण्यांच्या शेंगा सर्वाधिक असतात. उर्वरित प्रजातींच्या तुलनेत तेलाचे प्रमाण अधिक असते; मात्र एवढे करून कसे भागेल. त्याचे पेटंटदेखील आपल्याकडे हवे ना. मग तसे त्यांनी प्रयत्न सुरू केले. वाणाचे पेटंट मिळावे म्हणून त्यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव सादर केला. नुसता प्रस्ताव सादर करून भागणार नव्हते. मग सलग तीन वर्षे सोयाबीन वाणाचा मागोवा घेण्यात आला आणि तेव्हा कुठे त्यांना पेटंट मिळाले. सुरेश गरमडे यांनी शोधलेल्या सोयाबीनच्या वाणाला केंद्र सरकारच्या दिल्ली येथील वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे गरमडे यांना १५ वर्षांसाठी त्यांच्या सोयाबीन प्रजातीचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात वा निर्यात करण्याचा अधिकार मिळाला आहे आणि सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळविणारे ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत; हेच त्यांच्या मेहनतीचे फळ आहे.
मत देण्यासाठी इथे क्लिक करा